आज रानभाजी विक्री महोत्सव, सडक अर्जुनी तालुक्यात आत्माचा उपक्रम.



गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 12 ऑगस्ट 2021 – वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय अन्न होय. या भाज्यांच्या चवीला आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले व्यक्ती त्याच्याकडे कधीही पाठ फिरवत नाही. पाऊस सुरू झाला की या रानभाज्या कोणत्याही अतिरिक्त मेहनतीशिवाय आपोआप उगवतात अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच होय.

मानवी जीवनामध्ये सकस अन्नाचे महत्त्व रानभाज्या व फळांमुळे मिळतो, सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रानातील, शेत शिवारातील उगवला जाणाऱ्या भाज्यांचे महत्त्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना होण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सडक /अर्जुनी च्या वतीने तालुकास्तरीय रानभाजी विक्री महोत्सव याचे आयोजन गुरुवार 12 ऑगस्टला सकाळी 11 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसर सडक/अर्जुनी येथे आयोजित करण्यात येत आहे.

महोत्सवाचे उद्घाटक माननीय आमदार श्री. मनोहर चंद्रिकापुरे विधानसभा क्षेत्र अर्जुनी-मोर यांच्या हस्ते होणार असून शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष श्री.एफ.आर. टी.शहा उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व नागरिक, शेतकरी बांधवांना, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांनी जास्तीत जास्त संख्येने महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सडक/अर्जुनी यांनी केले आहे.


 

Leave a Comment