गोंदिया, दिनांक – 04 ऑगस्ट 2021 – 2 लाख 36 हजार रूपयांचा सडवा मोहपास रसायन पोलिसांनी जप्त केला, तर दोन्ही महिलांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवार, 3 ऑगस्ट रोजी करण्यात आली, तिरोडा शहरातील बिट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून संत रविदास वॉर्डातील हातभट्टीच्या दोन अवैध अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मार कार्यवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या आदेशान्वये मपोशि नंदा बडवाईक यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, पोलीस नायक सव्वालाखे, पोलीस शिपाई तिरेले, रवी वडवाईक हे मंगळवारी तिरोडा शहरातील बिट परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान संत रविदास वॉर्डातील माया प्रकाश बरियेकर (वय 58) ही आपल्या घरी हातभट्टी बाळगून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलिसांनी दोन पंचासमक्ष माया बरियेकर हिच्या राहत्या घरी छापा मारला. दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष घरझळती घेतली. त्यावेळी घराच्या एका खोलीत 40 प्लास्टीक पोतडीत प्रत्येकी 40 किलोप्रमाणे 1600 किलो सडवा मोहापास रसायन अवैधरित्या आढळला. हा माल प्रती किलो 80 रुपये याप्रमाणे 1 लाख 28 हजार रुपये किंमतीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सदर माल पंचासमक्ष ताब्यात घेतला. सदर आरोपी ही महिला असल्याने कलम 41 (अ) अन्वये तिला नोटीस देण्यात आले. ही कारवाई काल सकाळी 8.50 ते 9.55 दरम्यान करण्यात आली. आरोपी माया प्रकाश बरियेकर (वय 58) रा. संत रविदास वॉर्ड हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या आदेशान्वये पोलीस शिपाई भुमेश्वरी तिरेले यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक जोगदंड, पोलीस नायक श्रीरामे, सव्वालाखे हे आज मंगळवारी शहर बिट परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान संत रविदास वॉर्डातील सुखवंता बाबुराव बरियेकर (वय 55) ही आपल्या घरी अवैधरित्या हातभट्टी बाळगून दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेवून सुखवंता बरियेकर हिच्या घरी छापा मारला.दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष तिची घरझळती घेतली. त्यावेळी घराच्या खोलीत 34 प्लास्टीक पोतडीत प्रत्येकी 40 किलो याप्रमाणे एकूण 1380 किलो सडवा मोहापास रसायन अवैधरित्या आढळला. सदर माल प्रती किलो 80 रुपये याप्रमाणे 1 लाख 8 हजार 800 रूपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पंचासमक्ष सदर अवैध माल कायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई आज मंगळवारी सकाळी 7.30 ते 8.45 वाजता दरम्यान करण्यात आली. आरोपी सुखवंता बाबुराव बरियेकर (वय 55) रा. संत रविदास वॉर्ड हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.