सावधान ! महाभयंकर वादळ पृथ्वीच्या दिशेनं येत आहे


नवी दिल्ली, वृत्तसेवा, 10 जुलै : सूर्याच्या परिमंडळातून तयार झालेलं एक महाभयंकर वादळ पृथ्वीच्या दिशेनं झेपावत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. या वादळाचा वेग ताशी 1609344 किलोमीटर एवढा असून ते रविवारी किंवा सोमवारी पृथ्वीवर धडकेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. अर्थात पृथ्वीवर पोहोचेपर्यंत या वादळाच्या वेगात फरक पडणार असला तरी अनेक यंत्रणांवर या वादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

स्पेसवेदर डॉट कॉम या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार सूर्याच्या परिमंडळातून या वादळाची निर्मिती झाली असून त्याचा परिणाम वेगवेगळ्या यंत्रणांवर होण्याची शक्यता आहे. रेडिओचे सिग्नल, विमानाची यंत्रणा, कम्युनिकेशनची माध्यमं आणि पाऊस या घटकांवर या वादळाचा विपरित परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या जवळ असणाऱ्या प्रदेशातून जर आकाशाकडे पाहिलं, तर पृथ्वीच्या जवळ असणारे इतर ग्रह यामुळे अधिक प्रकाशमान दिसू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वातावरणातील या बदलांमुळे पुढील दोन रात्री ग्रहांचा रंग अधिक चमकदार दिसेल आणि त्यांच्याभोवती या वादळामुळे निर्माण झालेली धूळही दिसू शकेल, असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे.


 

Leave a Comment