अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.


दिल्ली , वृत्तसेवा, दींनाक: 03 जुलै 2022 : २०१८ च्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटक करण्यात आलेले अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांचा जामीन अर्ज दिल्लीतील पटियाळा न्यायालयाने फेटाळला आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर जामिनासाठी मोहम्मद जुबेर यांनी अर्ज केला होता. सुनावणी दरम्यान पोलिसांनी एफआयआरमध्ये परदेशी योगदान नियमन कायद्याअंतर्गत नवीन कलमं दाखल केली असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी जुबेर यांचा अर्ज फेटाळत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

अल्ट न्यूज फॅक्ट चेक वेबसाईट प्रवदा मीडिया फाउंडेशन या एनजीओ मार्फत चालवण्यात येते. या एनजीओला पाकिस्तान, सीरिया, युएई, कतार या देशांतून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्याचबरोबर राझोरपे या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून विदेशी मोबाईल क्रमांक आणि आयपी अॅड्रेसवरून निधी आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच भादंविच्या कमल २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि १२० ब (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दिली. दरम्यान, या एनजीओला ज्यांनी पैसे पाठवले त्यांची माहिती आम्ही मागितली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, अल्ट न्यूज केवळ त्याच भारतीय व्यक्तींकडून निधी स्वीकारते, जे विदेशात राहतात मात्र, त्यांचे भारतीय बॅंकेत खाते आहे, अशी माहिती जुबेर यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.


 

Leave a Comment