मुम्बई वृत्तसेवा, दींनाक: 02 जुलै : 2022 : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात भाजपाने मुख्यमंत्रीपदाची माळ घातल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं म्हटलं. त्यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदेंची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवायांमुळे हकालपट्टी करत असल्याचं या पत्रात म्हटलंय. असं असतानाच एकनाथ शिंदेंनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही या उद्धव ठाकरेंच्या टीकेवरुन प्रश्न विचारला असताना सध्या थेट प्रतिक्रिया दिली नसली तर या प्रश्नाला मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलंय.
शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, असे स्पष्ट करीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने पुढील अडीच वर्षे तरी राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर धक्कादायक राजकीय घटनाक्रमांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपाचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना, शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत आणि हे शिवसेनेचे सरकारही नाही, असे स्पष्ट केले.
आता तर पाचही वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री नाही, असे सध्याचे चित्र आहे. यात भाजपाला काय आनंद मिळाला समजत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. ज्याने माझ्या पाठीत वार केला त्या तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली.