चंद्रपूर, वृत्तसेवा, दि. 29 सप्टेंबर 2024 : महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन आता गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचे व्यवस्थापन अदानी फाउंडेशन, अहमदाबाद या संस्थेकडे हस्तांतरित केले जाईल. या निर्णयामुळे शालेय व्यवस्थापनात मोठा बदल होणार असून, पुढील १५ दिवसांत शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन अदानी फाउंडेशनकडे जाईल. अशी माहिती सकाळ डिजिटल ने आज दि. 29 सप्टेंबर रोजी प्रकाशित करीत दिली आहे.
शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा, घुग्घुस, जि. चंद्रपूरचे व्यवस्थापन अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित केले जाणार आहे. या शाळेचे व्यवस्थापन बदलण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही महत्त्वाच्या अटी शर्ती घालून मान्यता दिली आहे. या अटींमध्ये शाळेची किमान पटसंख्या कायम ठेवणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण दायित्व अदानी फाउंडेशनवर राहील, तसेच शाळा इंग्रजी माध्यमातच राहील याची खात्री करणे आवश्यक आहे.
शासनाच्या निर्णयानुसार, शाळेचे व्यवस्थापन बदलल्यानंतर अदानी फाउंडेशनला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल. शासनाने दिलेल्या अटी शर्तींचे पालन न केल्यास, व्यवस्थापन हस्तांतरण रद्द करण्याचा अधिकार शासनाकडे राहील. याशिवाय, नवीन व्यवस्थापनाच्या तक्रारी किंवा अटींचा भंग झाल्यास, शाळेचे व्यवस्थापन पुन्हा सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, नागपूर विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी १५ दिवसांत व्यवस्थापन बदलाबाबतची कार्यवाही पूर्ण करावी आणि त्याची माहिती शासनाला कळवावी. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील इतर शाळांवरही कदाचित परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल घडू शकतात.
