सडक अर्जुनी, दी. २० जून : तालुक्यातील वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात एका जखमी बिबट्याने सकाळच्या सुमारास प्रवेश केला. ही बाब तेथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रेस्क्सू मोहीम राबवून बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
चूलबंध जलाशयाजवळ वनविभागाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या आवारात दी. १९ जून रोजी सकाळच्यावेळी जखमी अवस्थेत असलेल्या एका बिबट्याने प्रवेश केला. त्यानंतर या बिबट्याने विश्रामगृहातील एका खोलीत ठाण मांडले. ही बाब विश्रामगृहात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्यांनी लगेच याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चूलबंद जलाशयाच्या विश्रामगृहात पोहोचत एनएनटीआर व आरआरटी रेस्क्यू टिमला पाचारण केले.
जवळपास चार ते पाच तासांनंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आले. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर जखमी बिबट्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविले. बिबटच्या गळ्यावर जखम असून झुंजीमध्ये बिबट्या जखमी झाल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.