सडक अर्जुनी, दिनांक 13 जुन 2024 : सौंदड पिपरी परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामपंचायत सौंदड यांनी तालुका महसूल विभागाला एका लेखी निवेदनातून दिली होती. मात्र बराच कालावधी लोटल्यानंतरही महसूल विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे सरपंच हर्ष मोदी यांनी स्वतः पुढाकार घेत परिसरातून होत असलेल्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे ठरवले. दिनांक 12 जून रोजी सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी चुलबंदीच्या पिपरी नदी घाटावर अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करताना एक वाहन मिळून आले.
त्यांना वाहतूक परवाना विचारले असता त्यांच्याकडे कुठलाही वाहतूक परवाना उपलब्ध नसल्याने सदर वाहन जप्त करण्यात आले याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे तसेच 112 वरून पोलीस विभागाला देण्यात आली दरम्यान स्थानिक पोलीस पाटील सीमा निंबेकर, ग्रामपंचायतचे कर्मचारी रोशन हटकर, पवन चुटे, मदन साखरे, तलाठी मुस्ताक कुरेशी उपस्थित होते, जप्त केलेल्या वाहनाचा पंचनामा करून सदर वाहन महसूल विभागाला स्वाधीन करण्यात आले आहे.
जप्त केलेल्या वाहनाचे क्रमांक : एम एच 35 ए. डब्ल्यू. 1442 असे असून ट्रॉली क्रमांक नव्हता सदर वाहनामध्ये एक ब्रास वाळू मिळून आली, प्रशासन पुढे काय कारवाई करते हे पाहण्यासारखे असेल, यापुढे वाहन जप्त केल्यास ग्रामपंचायत सौंदड प्रति वाहनाकडून 5000 हजार रुपये दंड वसूल करेल असे सांगण्यात आले आहे. सदर वाहन चालक मनोहर मेश्राम असे असून वाहन मालक अमोल मेंढे असे आहेत.
परिसरातून होत असलेल्या अवैध रेती उत्खनन मुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी खोल जात आहे. यामुळे शेतीला लागणारे पाणी तसेच गावात पिण्यासाठी लागणारे पाण्याची टंचाई भासत आहे. नियमित होत असलेल्या अवैध रेती उत्खननावर प्रशासन पाहिजे ती कारवाई करत नसल्याने चुलबंद नदी सर्वत्र पोखरून गेल्याचे चित्र आहे.
यामागे महसूल विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचेही चित्र आहे. सततच्या होत असलेल्या वाळू उत्खननामुळे महसूल विभागाला रोज लाखो रुपयांचा चुना लागत आहे. प्रशासन आता तरी लक्ष देणार का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.