फक्त ३ लाख क्विंटल धान खरेदी, जिल्ह्यात रब्बी धान खरेदीत घट

संग्रहित छायाचित्र

७२७६ शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री

गोंदिया, दी. १२ जून : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ७९ धान खरेदी केंद्रांवरून रब्बीतील धान खरेदी सुरू असून, आतापर्यंत २ लाख ९८ हजार ९१९ धानाची ७२७६ शेतकऱ्यांनी विक्री केली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत १५ लाख क्विंटलवर धान खरेदी झाली होती. धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धान खरेदीत मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभावाने आणि रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते; पण यंदा धान खरेदीला तब्बल दीड महिना उशिराने सुरू झाल्याने त्याचा धान खरेदीवर परिणाम झाला आहे, तर खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल न झाल्याने आदिवासी विकास महामंडळाने यंदा रब्बीत धान खरेदी केली नाही.

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी करण्याची मुदत ३१ मे रोजी संपली असून जिल्ह्यातील १६७७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी आतापर्यंत ७२७६ शेतकऱ्यांनी २ लाख ९८ हजार ९१९ क्विंटल धानाची खरेदी केंद्रावर हमीभावाने विक्री केली आहे.

विक्री केलेल्या या धानाची एकूण किंमत ६५ कोटी २५ लाख ४२ हजार २९४ रुपये आहे, तर खरेदी केलेल्या २५ लाख क्विंटल पैकी केवळ २० हजार क्विंटल धानाची उचल राइस मिलर्स आणि शासन यांच्यातील तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने शासकीय धान भरडाई रखडली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात २५ लाख क्विटल धान खरेदी करण्यात आली होती.

यापैकी आतापर्यंत केवळ २० हजार क्विटल धानाची भरडाईसाठी उचल झाली आहे. मोठ्या प्रमाणात धान भरडाईच्या प्रतीक्षेत केंद्रावर आणि गोदामात पडून असल्याने तो खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ५५९ क्विंटल मका खरेदी मागील तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील मका लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमीभावाने मका खरेदी केला जात आहे. आतापर्यंत तीन खरेदी केंद्रांवरून २०९० प्रतिक्विंटल हमीभावाने ५५९ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. सर्वच धानाचे चुकारे थकीत आहेत. सद्य:स्थितीत एकूण ७९ धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी सुरू असली तर अद्यापही केंद्रावर पाहिजे तशी आवक नसल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

और पढ़ें