अपघात दोघांना ठार करणार्या अल्पवयीन धनीपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहण्याचे न्यायालयाने दिले ‘कठोर’ निर्देश !!

पुणे वृत्तसेवा, दि. 22 मे 2024 : भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलांला 15 तासात जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी चुकीचा तपास केला, पैशांची देवाण घेवाण करून सेटलमेंट केली असा आरोप विरोधकां कडून करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगले तापले. आता याच मुद्द्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत. काल देवेंद्र फडणवीसांच्या कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी 24 तासात या प्रकरणी सात जणांना अटक केले आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही मध्ये दारू पितानाचे व्हिडिओ असून सुधा आरोपी याचे निगेटिव्ह रीपोट समोर आली आहे. 

प्रकरणी सात जणांना अटक

पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलीय. जी.एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आलीये. विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आलीये. अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभूज डोळस आहे तर दुसरा व्यक्ती राकेश पौडवाललाही अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक देखील आली आहे.

विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल 

विशाल अग्रवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहित असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हे नॉट रीचेबल झाले होते अखेर त्यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केल आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले 

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

अपघातात दोघांचा मृत्यू 

बाईकवरुन जात असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना चिरडले होते. यावेळी पोर्शे गाडी इतक्या वेगात होती की, अश्विनी कोस्टा हवेत उंच फेकली जाऊन जमिनीवर आपटली होती. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनिस अवधिया याच्या बरगड्यांना जबर मार लागून त्याचाही मृत्यू झाला होता.

आरोपीला पिझ्झा आणि बर्गर

या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत असताना पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारचालक मुलगा आणि त्याच्या मित्रांना दुपारी दीडच्या सुमारास येरवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्यपदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात नेले, असे वृत्त महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात प्रकाशित झाले आहे. तर या पोलिसाला निलंबित करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. 

300 शब्दांचा निबंध लिहण्याचे ‘कठोर’ निर्देश

अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढून चोपले होते. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा धनिकपुत्र अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. न्यायालयाने या धनिकपुत्राला 15 दिवस वाहतूक पोलिसासोबत चौकात उभे राहून काम करण्याची, वाहतुकीचे बोर्ड रंगवण्याची आणि अपघात या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहण्याचे ‘कठोर’ निर्देश दिले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

“पोलिसांनी या घटनेत भादंविचे 304 हे कलम लावले आहे, 304 अ लावलेले नाही. त्यामुळे प्रारंभीच कठोर भूमिका घेण्यात आली. या प्रकरणातील मुलगा हा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे. पण, निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार, गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जात नमूद केले आहे. पण, बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Comment

और पढ़ें