सावंगी – कोहळीटोला परिसरातून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी, महसूल विभागाने केला 17 ब्रास रेतीचा पंचनामा.

सडक अजूनी, दिनांक : 21 मे 2024 : सडक अर्जुनी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध रित्या चोरी होत असल्याच्या अनेक बातम्या महाराष्ट्र केसरी न्युजने प्रकाशित केल्या आहेत. 2024 मध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील सद्यास्थितीत एकही रेतीघाट लिलावात नाही. असे असते तरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याचे चित्र आहे.

आज दिनांक : 21 मे रोजी तालुक्यातील ग्राम सावंगी – कोहळीटोला स्मशान भूमी परिसरात अवैधरित्या रेतीची साठवण करून ठेवलेल्या 17 ब्रास रेतीच्या साठ्यावर महसूल विभागाने कारवाई केली आहे. सदर रेती ही ससिकरण नाल्यातील उपसा करून डंपिंग करून ठेवली होती.

जप्त केलेली 17 ब्रास रेती ही सरकारी जागेत अवैध रित्या साठवण करून ठेवली होती, सदर रेतीचा पंचनामा करून स्थानिक पोलीस पाटील सुशील विकास तानडे यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. उप विभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई नायब तहसीलदार शिंदे, मंडळ अधिकारी बी. डी. वरखडे, तलाठी हरीश कुमार ऊईके यांच्या पथकाने केली आहे.

सदर रेती ही खाजगी जागेत मिळाली असती तर रेतीचे सरकारी रेट प्रती ब्रास 4 हजार 500 नुसार 17 ब्रास रेतीचे 76 हजार 500 रुपये होतात, त्यावर पाच पट दंड आकारल्यास 3 लाख 82 हजार 500 रुपये एवढा दंड आकारण्यात येतो मात्र सदर रेती ही सरकारी जागेत मिळाल्याने त्यावर महसूल विभागाने दंड आकारला नाही.

सदर भागातून रोज रात्री मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध रित्या वाहतूक होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी नाव न समोर करण्याच्या सर्यतीवरून महाराष्ट्र केसरी न्यूज च्या टीम सोबत बोलताना दिली आहे. तर सदर वाळू कुणाच्या मालकीची आहे. आणि कोण या भागातून वाळूचा अवैध कारभार चालवतोय त्याची देखील माहिती दिली आहे. असे असले तरी महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सडक अर्जुनी तालुक्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून रेतीची डंपिंग अवैध रित्या केली जाते. मात्र महसूल विभागाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करणार्या माफियांवर कारवाई करण्यासाठी तालुक्यातील महसूल विभागाचे पथक फिरताना दिसत नाही. जप्त केलेली वाळू ही तहसील कार्यालयात जमा होणार की रात्रीला चोरी जाणार हे पाहण्यासारखे असेल.

 

Leave a Comment

और पढ़ें