कोल्हापूर, वृत्तसेवा, दी. 05 मे 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. साम टिव्ही ने दिलेल्या माहिती नुसार विदर्भात देखील दहा जागा आम्ही जिंकत आहोत, नितीन गडकरी देखील नागपूरमधून निवडणूक जिंकणार नाहीत. महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक होताना दिसत आहे, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, किमान 38 जागा आम्ही जिंकू अशी परिस्थिती दिसत आहे. देशात सत्तांतर होणार, तानाशाही, जुमलेबाज सरकार जाणार आहे. शाहू महाराज यांनी निवडणूक लढावी, अशी आमची आणि कोल्हापूरकरांची इच्छा होती. ती त्यांनी मान्य केली. शाहू महाराज 5 लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
10 वर्षात काय उपलब्धी हे सांगण्याऐवजी काँग्रेसच्या नावाने बोंबा मारत आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची किती भीती आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात दिसत असल्याचं वडेट्टीवार म्हटले आहेत. देशात 2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बेरोजगारी वाढली आहे, त्यावर बोलत नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.
आरक्षणाची मर्यादा 73 टक्के पर्यंत वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जो समाज आरक्षणापासून वंचीत आहे, त्यांना न्याय देऊ असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिलं आहे. कायद्याला धरून आरक्षण दिलं जाईल, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. भाजपने घरं फोडली. पक्ष फोडले. आमच्या घराच्या देखील काही खिडक्या घेऊन गेले. नांदेडची खिडकी भाजपने काढून नेली, पण आमचं घर शाबूत आहे. सुशोभीत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच उज्ज्वल निकम यांचा पराभव नक्की आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.