अर्जुनी मोर, दी. 14 डिसेंबर : तालुक्यातील बाराभाटी शेत शिवारात रान हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पॅक हाऊस सोबत तिनशे पोते धान आणि पोल्ट्री फार्मचे ही नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होताच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी 13 डिसेंबर रोजी घटना स्थळी भेट दिली यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नवेगाव बांध प्रादेशिक चे वनपरिक्षेत्राधिकारी एस. जी. अवगान व वन विभागाचे अन्य कर्मचारी यांच्या सोबत घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली.
त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिले. पोपट, हळद, मिरची, तूर व उन्हाळी प-ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अर्जुनी मोरगाव तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, नवेगाव बांध प्रादेशिक चे वनपरिक्षेत्राधिकारी एस. जी. अवगाण, क्षेत्र सहाय्यक व्ही. एम. करंजेकर, बीटरक्षक व्ही. एल. सयाम, वन मजूर एस. टी. राणे, नवेगाव बांधचे क्षेत्र सहाय्यक एल. व्ही. बोरकर हे घटनास्थळी दाखल झाले व त्वरित नुकसानीचे पंचनामे तयार केले असून शासनाला सादर करण्यात येणार आहे.
यावेळी भाजपा तालुका महामंत्री लैलेश्वर शिवणकर, बाजार समितीचे संचालक व आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष व्यंकट खोब्रागडे, उपसरपंच किशोर बेलखोडे, नरेश खोब्रागडे, सरपंच भीमराव चर्जे, हिवराज औरासे व शेतकरी उपस्थित होते.