सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधायुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


रत्नागिरी, दि.30 : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधायुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. राजीव निवतकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शिरगावच्या सरपंच फरिदा काझी, माजी आमदार विनय नातू, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला होता आणि वर्षभरातच त्याचा शुभारंभ होत आहे. 430 खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील 400 ठिकाणी झाली आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची रक्कम 5 लाखांवर वाढविली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून 1 कोटी 80 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणात जेवढी विकास कामे आणता येतील तेवढी आणू. रत्नागिरी विमानतळाला 118 कोटी मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीमधून 160 कोटी रुपये खर्च झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु, बळीराजाने चिंता करु नये. सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रम या सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, या महाविद्यालयामुळे मागणी पूर्ण झाली आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला. भविष्यात टप्प्याटप्प्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा मानस आहे. बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रम देखील या महाविद्यालयात सुरु केला जाईल. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी भरतीसाठीचा शासन निर्णय काढूनच येथे आलो आहे. शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दूरध्वनीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्यास सांगितले. त्यासाठी 522 कोटी रुपये मंजूरही केले. पुणे, मुंबई नंतर रत्नागिरीला परिपूर्ण एज्युकेशन हब बनविण्यासाठी मेडिकल कॉलेजदेखील दिले. उद्योजकांना 100 टक्के इन्सेव्टिव्ह देण्याचा निर्णय देखील घेतला.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी, तर मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी आभार प्रदर्शन केले.

दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ

वसंत घाणेकर, संजय पावसकर यांना घरकुल योजनेसाठी 6 लाख 80 हजार निधी वितरीत करण्यात आला. दिनेश शितप व मुक्ता शिरसाट, सूरज अवसरे व सोनाली जाधव यांना दिव्यांग-दिव्यांग विवाह योजनेत 5 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. अंकिता कोलगे, संदीप कांबळे, भारती भायजे, संतोष रहाटे यांना स्वयंचलित 3 चाकी सायकल वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थ्यांना व्हील चेअर, सीपी चेअरचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील 2 हजार 443 सीआरपींना मोबाईल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात 6 महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल वाटप करण्यात आले. ‘नमो शेततळी’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.


 

Leave a Comment

और पढ़ें