प्रतिनिधी / सालेकसा, दी. 24 नोव्हेंबर 2023 : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे 18 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेचे पडसाद आरोग्य विभागावर दिसले आहेत. सालेकसा तालुका काँग्रेस कमिटी च्या माध्यमातून शव विच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने येत्या सात दिवसात डॉक्टरांची व्यवस्था न केल्यास आंदोलन करण्याच्या इशारा दिला होता. त्यावर आरोग्य विभाग दखल घेत डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था करण्यास भाग पडला. जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्या आदेशाने येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत प्रती दिवस २ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पण पूर्णकालीन नियुक्ती कधी ?
आरोग्य विभागाचे हे केवळ वेळकाढू धोरण आहे, या महिन्याच्या शेवटी पर्यंत व्यवस्था केली गेली आहे, परंतु पुढच्या महिन्यात काय ? आम्ही पूर्णवेळ डॉक्टरांच्या नियुक्ती करिता मागणी केली आहे. तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या डॉक्टरांना शव विच्छेदन करण्याच अधिकार, प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राहणार आहे का ? अश्या परिस्थितीत तात्पुरता उपाय करणे कितीपत योग्य आहे ? आमची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पूर्णकालीन डॉक्टरांची नियुक्ती शिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा सवाल काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष राजू दोनोडे यांनी केला आहे.