अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत अखेर मंजूर


खा. प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा : जिल्ह्यातील ३०६ हेक्टरमधील पिकांचे झाले होते नुकसान…


गोंदिया, दी. १७ ऑक्टोबर : सन २०२३ च्या उन्हाळी हंगामात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकासह फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. दरम्यान खा. प्रफुल्ल पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने यासाठी मंगळवारी ( दि.१७ ) आर्थिक मदत मंजूर केली आहे. यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांत सन २०२३ च्या उन्हाळी हंगामात मार्च एप्रिल-मे महिन्यात परतीच्या पावसामुळे जोरदार हजेरी लावली होती. परिणामी, शेकडो हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात होते. त्याचा अहवालही कृषी विभागांतर्गत शासनाला पाठविण्यात आला; पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नव्हती. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून महसूल व कृषी विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला. त्यानंतर सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे क्षेत्र वगळूनच हमीभाव केंद्रावर धान खरेदी करण्यात आली.

असे असताना सुद्धा व बराच कालावधी लोटून सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपडेट करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही बाब माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला. ८ सप्टेंबरला खा. पटेल यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना पत्र देऊन नुकसानग्रस्त शेकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली होती.

त्याचीच दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मंगळवारी यासंदर्भातील जीआर काढत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मंजूर केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले आहे.

७८६ शेतकऱ्यांसाठी ५१ लाख ९३ हजार रुपयांची मदत… 
जिल्ह्यात सन २०२३ च्या उन्हाळी हंगामात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार ३०६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील ७८६ शेतकरी बाधीत झाले. या बाधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाने ५१ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें