- वीज वितरण कंपनी व कंत्राटदार यांचे हलगर्जीपणामुळे हेटी येथील मजूर धनराज लांजेवार वय ३२ वर्षे यांचा मृत्यू झाला.
सौंदड, ( भामा चुऱ्हे ) : दि. 10 ऑगस्ट : म. रा. वीज वितरण कंपनी सडक अर्जुनी अंतर्गत सब स्टेशन ( वीज वितरण ) कार्यालय सौंदड वरून अर्धा किमी. अंतरावर फुटाळा टोली येथील भगवान वैद्य ते वसंत गहाणे यांचे प्लाॅटच्या मध्यभागातील प्रल्हाद पर्वतकर यांचे वाडी समोर एल. टी. ( गाव लाईन ) व ११ के. व्ही. लाईन गेली आहे.
या दोन्ही लाईनच्या तारामध्ये दोन मीटर चा अंतर आहे. २३ जुलै ला ४.३० वाजेदरम्यान गाव लाईन ( एल. टी. ) बंद करून वीज वितरण कंपनीचे कंत्राटदाराचे विद्युत खांब गाडणे सुरू होते. या कामावर कंत्राटदाराचे वायरमन निलेश पुस्तोडे आणि हेटी येथील चार मजुर काम करीत होते. सौंदड येथील मेंढे यांचे ट्रॅक्टर वर खांब आणून खांब गाडण्याचे ठिकाणी ट्रॅक्टर उभे केले.
आणि ट्रॉलीवर असलेल्या खांबाला रस्सा बाजूने बांधून ट्रॉली वरून खड्ड्याजवळ खांब उभा केला. खांब उभा करतांनी एल. टी. व ११ के. व्ही. लाईनच्या मधोमध खांब उभा केला त्यावेळेश धनराज हा साबरीने समोरील खड्ड्यामध्ये खांब सरकवू लागला.खांब खड्ड्यात पळताच खांबाचा तोल ११ के. व्ही. लाईनच्या तारांना स्पर्श होताच खांबाला करंट येऊन स्पार्कींग होताच साबर धरणारा धनराज बाजूला फेकला गेला.
त्यावेळेश खांबाचा रस्सा धरून ठेवणारे मजूर सुद्धा स्पार्किंग होताच रस्सा सोडून पळाले. आणि धनराज हा मोक्यावरच मरण पावला. त्याला वायरमन निलेश पुस्तोडे यांनी मजूराचे सहाय्याने ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे आणले. पण तिथे भरती न केल्याने साकोली येथील रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत्यू असल्याचे सांगितले. वास्तविक पूर्ण लाईन बंद करूनच काम करायला पाहिजे होते. पण तसे न करता काम केले. सदर घटना घडली त्यावेळी वीज वितरण कंपनीचे लाईनमेन व इंजिनिअर मोक्यावर नव्हते.
२३ जुलै हा रविवारचा दिवस असल्याने या दिवशी विद्युत विभागाचे काम बंद असते. जसे खांब गाडणे व तार लांबविणे. खांब गाडण्यासाठी चार फुट खड्डा खोदला असता तर सदर दुर्घटना घडली नसती. ११ के. व्ही. खांब ९ मीटर लांब असते. व एल. टी. खांब ८ मीटर असते. कंत्राटदाराने अडीच फुट खोल खड्डा खोदल्याने आणि पावसाळा असल्याने खड्ड्यात पाणी सुद्धा साचले होते.
विशेष म्हणजे म. रा. वीज वितरण कंपनी जनजागृती करून सांगत फिरते की, पावसाळ्याच्या दिवसात विद्युत खांबांना किंवा विद्युत तारांना तसेच वीज वाहिन्या व अन्य उपकरणांना स्पर्श करू नये. आणि दुसरीकडे पैशाचे लालसेपोटी पावसाळ्यात खांब गाडणे व विद्युत तार जोडण्याचे काम मजूराकडून करवून घेतात. वीज वितरण कंपनी व कंत्राटदार यांचे हलगर्जीपणामुळे, लालचीपणामुळे अशा अनेक घटना घडतात.
वीज वितरण कंपनी व कंत्राटदार यांचे हलगर्जीपणामुळे हेटी येथील मजूर धनराज लांजेवार वय ३२ वर्षे यांचा मृत्यू झाला. मृतक धनराज यांचे मृत्यूस कारणीभूत वीज वितरण कंपनी व कंत्राटदार यांनी मृतकाचे कुटुंबियांना १० लाखाचे आर्थिक सहाय्य करण्यात यावे. अशी मागणी मृतकाची पत्नी प्रिती धनराज लांजेवार वय २४ वर्षे यांनी केली आहे.
मृतक धनराज यांना एक मुलगा ३ वर्षाचा तर एक मुलगी ६ महिन्याची व वयोवृध्द आई-वडील आहेत. घरचा कमावता व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्याने या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. तसेच यांचा मोठा घात झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच सदर प्रतिनिधीने घटना स्थळाची पाहणी करुन मृतकांचे कुटुंबियांची हेटी येथे सरपंच प्रमोद गहाणे यांचेसोबत भेट घेतली असता कुटुंबियांनी सांगितले की, याप्रकरणाची पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे ४ आॅगस्ट रोजी बयान दिल्याचे सांगितले.