राज्यात पुन्हा मोठे राजकीय भूकंप : अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री


  • अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी देखील घेतली मंत्रीपदाची शपथ !

मुंबई, वृत्तसेवा, दिनांक : 02 जुलै 2023 : महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने हादरले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि.2) अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.



https://fb.watch/lw-cCz9ORG/?mibextid=RUbZ1f


त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती. त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करावे आणि दुसरी जबाबदारी द्यावी, असे म्हटले होते. तसेच त्यांनी 1 जुलैपर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. मात्र, यावर निर्णय न झाल्याने आज अजित पवार यांनी देवगिरी येथे बैठक बोलावली आणि राज्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा मोठा टर्निंग पॉइंट घेतला. आज रविवारी दुपारनंतर मोठ्या वेगाने घडामोडी घडत गेल्या.

अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर शरद पवार यांचा अहमदनगर दौरा रद्द झाला. शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधी पक्ष नेते पदावरून राजीनाम्याबाबत फारशी माहिती दिली नाही. तर 6 जुलै रोजी राष्ट्रवादीची बैठक होईल, त्यावेळी पुढील गोष्टी ठरविली जातील. एवढीच माहिती त्यांनी दिली. तर देवगिरीवर अजित पवार यांनी बैठक बोलावल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांना नव्हती असे, सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले होते.

मात्र, नंतर त्या तातडीने देवगिरीकडे रवाना झाल्या. लगबगीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही देवगिरी गाठले होते. मात्र, सुळे पोहचण्याआधीच राष्ट्रवादीचा खेळ खल्लास झाला होता. याबाबतची माहिती सुळे यांना कळताच त्यांनी देवगिरी सोडले.

देवगिरीवर हा फाटाफुटीचा खेळ सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जोरदार खलबते सुरू होती. देवगिरीवरील बंड यशस्वी झाल्याचा संदेश मिळताच राजभवनवर शपथविधीची तयारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री म्हणून आज अजित पवार यांच्यासह छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.


 

Leave a Comment

और पढ़ें