8 लाखांची लाच घेणारे, महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्तांच्या घरातून सहा कोटी रुपये जप्त.


पुणे, दिनांक : १० जून : पुणे-सोलापूर महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी तक्रारदाराकडून 8 लाखांची लाच घेणाऱ्या पुण्यातील महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. डॉ. रामोड यांच्या बाणेरमधील ऋतूपर्ण सोसायटीच्या फ्लॅटमधून सीबीआयच्या पथकाने सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करत त्यांना अटक केली आहे. ही कारवाई पुणे जिल्हा परिषदेनजीक असलेल्या मॉलजवळ करण्यात आली. दरम्यान, आयएएस अधिकाऱयांवर धाड पडल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत भूसंपादनाचा परतावा लवकर देण्यासाठी डॉ. अनिल रामोड यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. मात्र, याप्रकरणी संबंधिताने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सीबीआयचे एक पथक शुक्रवारी पुण्यात दाखल झाले होते. लाच स्वीकारताना रामोड यांना पुणे जिल्हा परिषदेनजीक असलेल्या एसजीएस मॉलजवळ ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बाणेरमधील ऋतूपर्ण सोसायटीतील फ्लॅटमध्ये 20 अधिकाऱयांच्या पथकाने झाडाझडती घेऊन सहा कोटींची रोकड जप्त केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात (काऊन्सिल हॉल) डॉ. अनिल रामोड यांचे कार्यालय आहे. त्यांच्या दालनातून सीबीआयच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, आयएएस अधिकाऱयावर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. रामोड मूळचे नांदेडमधील असून, तेथील घरावर देखील छापा टाकण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. सीबीआयच्या पथकाने सुरू केलेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.


 

Leave a Comment

और पढ़ें