- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.
सडक अर्जुनी, दिनांक : 04 जून : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया सदैव शिक्षक हितासाठी लढणारी संघटना आहे. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. 6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार कर्मचारी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा स्पष्ट उल्लेख असतांना गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाकडून 12 वर्षाच्या चटोपाध्याय वेतनश्रेणी मंजुरी नंतर एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देणे बंद करण्यात येत होता.
हा नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देवून कळविण्यात आले. परंतु निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे किशोर बावनकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया ने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाने दाखल केलेल्या याचिकेला उच्च न्यायालयाने न्याय दिला. कर्मचारी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्याचे व एकस्तर संबंधी कोणत्याही प्रकारची वसुली करण्यात येऊ नये असे आदेश दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाने न्यायालयीन लढा जिंकून इतिहास घडविला. गोंदिया जिल्ह्यातील जवळपास याचिकाकर्त्या 1700 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्या मुळे सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया ने मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना करण्यात आली. गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने व मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्या आदेशानुसार गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, अशी आग्रही मागणी संघाच्या वतीने करण्यात आली.
या पूर्वी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गोंदिया यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एकस्तर वेतनश्रेणी सतत सुरू ठेवण्याचा आदेश देऊन याचिककर्त्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय दिला. याबाबद्दल जिल्हा संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनाची दखल घेऊन गोंदिया जिल्हयातील सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया यांनी व्यक्त केली आहे.