“माझ कुणीही वाकड करु शकत नाही” : नाना पटोले


संग्रहित छायाचित्र


मुंबई, वृत्तसेवा, दी. 29 मे 2023 : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चा सातत्याने पुढे येत असतात. काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा एक गट विरुद्ध नाना पटोले यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने सुरु असतात.

विशेष म्हणजे पक्षातील दिग्गज नेते माध्यमांसमोर उघडपणे देखील भूमिका मांडताना दिसतात. तर काही नेते दिल्लीत हायकमांडकडे जावून नाना पटोले यांच्याबद्दल तक्रारदेखील करतात, अशी देखील चर्चा सुरु होती. आता तर थेट नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागेल, अशा चर्चा सुरु आहेत. याच चर्चांवर आता नाना पटोले यांनी भूमिका मांडली आहे. आज टीव्ही9 मराठीने दिलेल्या माहिती नुसार.

“माझ्याच अध्यक्षतेखाली काँग्रेस आगामी निवडणुका लढवणार आहे”, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. “येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मीच अध्यक्ष म्हणून काम करेन”, असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. तसेच “माझं कुणीही वाकडं करु शकत नाही”, असं नाना पटोले म्हणाले. त्यांनी या वक्तव्यातून पक्षातील विरोधकांना कडक शब्दांत उत्तर दिलं असल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत… 

“मी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करेन. त्यामुळे या सर्व गोष्टींवर पडदा पडलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना काँग्रेसमध्ये कोणतंही स्थान नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्याच जागा कशा जिंकायच्या यासाठी आमचा प्लॅन सुरु झालेला आहे”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

“पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत मेरीटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मेरीटवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. मेरीटवर निर्णय घेऊ आणि काँग्रेसचंच पुण्यामध्ये मेरीट आहे”, असा दावा पटोलेंनी केला.

संविधानिक व्यवस्था संपवणाऱ्या भाजपचा… 

“या देशाचा मूळ इतिहास आहे, त्या इतिहासाला संपवण्याचा मानस भाजपचा आहे. आपण काल दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पाहिलं की, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा काढणे हा केवळ महिलां अपमान नाही, तर महाराष्ट्राच्या शूरवीर महिलांनी जागतिक पातळीवर जो विचार दिला त्या विचाराला संपवण्याचं काम भाजप करत आहे. या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो. संविधानिक व्यवस्था संपवणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो”, असं नाना पटोले म्हणाले.


 

Leave a Comment

और पढ़ें