दिल्ली, वृतसेवा, दिनांक : ०४ मे २०२३ : अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात १२ दिवसांपासून कुस्तीगीर दिल्लीतील जंतरमंतर मैदानात आंदोलनाला बसले आहेत. त्यातच बुधवारी (३ मे) रात्री कुस्तीगीर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटीची घटना घडली आहे. आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीगीरांशी गैरवर्तन केल्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘मद्यप्राशन करून पोलिसांनी शिव्या दिल्या. तसेच भावाचे डोके फोडले,’ असा आरोप कुस्तीगीर विनेश फोगाटने केला आहे. या वेळी विनेश फोगाटला अश्रू अनावर झाले.
“आम्ही गाद्या मागवल्या होत्या. त्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला. तेव्हा उपस्थित असलेल्या एका पोलिसाने मद्यप्राशन केलं होतं. त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. हे दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी पदके आणली होती का? आमचा एक कुस्तीगीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात नेऊ दिलं जात नाही,” असंही फोगाटने सांगितलं. बजरंग पूनियाने म्हटलं, “दिल्लीत सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे गाद्या आणल्या होत्या. पण, पोलिसांनी यावर आक्षेप घेतल्याने वाद झाला.”
#WATCH | Delhi: A scuffle breaks out between protesting wrestlers and Delhi Police at Jantar Mantar pic.twitter.com/gzPJiPYuUU
— ANI (@ANI) May 3, 2023
आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी कुस्तीगीरांसाठी खाट आणि गाद्यांची व्यवस्था केली होती. पण, दिल्ली पोलिसांनी सोमनाथ भारती यांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी कुस्तीगीरांना मारहाण झाल्याचा आरोप फेटाळला आहे. पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत म्हटले, “आप नेते सोमनाथ भारती कोणत्याही परवानगीशिवाय खाट घेऊन जंतरमंतरवर आले होते. ट्रकमधून खाट काढण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी हस्तक्षेप केला. तेव्हा काही किरकोळ भांडण झाले. याप्रकरणी सोमनाथ भारतीसह अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.”