- खाजगी इसम सह एक गृहनिर्माण अभियंता व ग्रामपंचायत शिपाई अडकले एसीबी च्या जाळ्यात.
- आवास योजने चा अनुदान वर्ग करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपये ची मागितली लाच.
गोंदिया, दि. 01 जानेवारी 2025 : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनुदान तक्रारदार यांच्या पोस्टातील खात्यात वर्ग करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केल्या प्रकरणी गोंदिया ACB ने मोठी कारवाई केली असून यात एक खाजगी इसम सह एक गृहनिर्माण अभियंता व ग्रामपंचायत शिपाई जाळ्यात अडकले आहे. वर्षाच्या सुरवातीलाच लाच खोरानी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला असून जिल्ह्यातील एसीबी ने मोठी कारवाई करीत त्यांचा लाच घेण्याचा डाव हाणून पाडला आहे. त्या मुळे लाच घेताना जरा जपून रे… बाबा!
या गुन्ह्यातील आरोपी लोकसेवक 01) श्री. प्रमोद बीरसिंग उपवंशी वय 38 वर्ष, गृहनिर्माण अभियंता ( कंत्राटी), पंचायत समिती गोंदिया, 02) धनंजय मुन्नालाल तांडेकर वय 45 वर्ष शिपाई, ग्रामपंचायत कामठा, 03) खाजगी ईसम विश्वनाथ गोविंदराव तरोणे वय 62 वर्ष धंदा हॉटेल, कामठा, असे असून यांच्या विरोधात तक्रार दि. 23/ 12/ 2024 रोजी करण्यात आली असून पडताळणी दि. 31/ 12/ 2024 पर्यंत करण्यात आली, सापळा कार्यवाही दि. 01/ 01/ 2025 आज रोजी करण्यात आली आहे, यात आरोपी यांनी 10 हजार रुपयाची लाच मागणी केली असून तिन्ही आरोपी विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विविध कलमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर असे की – यातील तक्रारदार हे शेतमजुरी करीत असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून माहे सप्टेंबर 2024 मध्ये घरकुलाच्या अनुदानाचा पहिला हप्ता 15 हजार रुपये तक्रारदार यांच्या पोस्ट ऑफिस मधील खात्यावर जमा झाला होता, त्याबाबत आरोपी क्रं : 02 याने तक्रारदारास कळविले होते. त्यानंतर त्यांनी घरकुलाचे बांधकाम चालू केले व पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आरोपी क्रं : 02 यास कळविले होते.
दि. 27/ 11/ 2024 रोजी आरोपी क्रमांक 01 व 02 यांनी तक्रारदाराच्या घरी येऊन घराच्या बांधकामाचे फोटो काढले व घरी हजर असलेल्या तक्रारदाराच्या मुलास घरकुलाचे अनुदानाचे 15 हजार रुपये वर्ग केल्या बाबत व घरकुलाच्या अनुदानाची उर्वरित रक्कम वर्ग करणार असुन त्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयाची मागणी केली होती.
दि. 21/ 12/ 2024 रोजी आरोपी क्रं : 01 याने तक्रारदारास फोन करून अनुदानाचा दुसरा हप्त्याचे 70 हजार रुपये तक्रारदाराच्या खात्यात वर्ग
केल्याबाबत सांगुन 10 हजार रुपये आरोपी क्र : 02 याच्या कडे देण्यास सांगितले होते. तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला. प्र. वि. कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली, लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी क्र : 01 याने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनुदान तक्रारदार यांच्या पोस्टातील खात्यात वर्ग करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली व आरोपी क्र : 02 याने लाच मागणीस प्रोत्साहन दिले. सापळा कारवाईदरम्यान आरोपी क्रमांक 01 व 02 यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक 03 याने तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 10 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली, लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन रावणवाडी जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सापळा कार्यवाही विलास काळे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पो.नि. उमाकांत उगले, स.फौ. चंद्रकांत करपे, पो. हवा. संजय कुमार बोहरे, मंगेश काहालकर, ना. पो. शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने, म. ना. पो. शि. संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक ना.पो.शि. दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली आहे.