भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू! अनेक जखमी


मुंबई, वृतसेवा, दिनांक : १४ एप्रिल २०२३ : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याशिवाय या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांपैकी २० ते २५ जण जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे.

मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट ( झांज पथक ) हे पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली. पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.

“घाट परिसर असल्यामुळे उतार खूप जास्त आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला असण्याची शक्यता आहे. बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. त्यातल्या २७ जणांना वाचवण्यात आलं आहे. इतरांना वर काढण्याचं काण चालू आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली. आमच्या माहितीनुसार १३ जण दगावले आहेत”, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली आहे.

दरम्यान, घटनास्थळी वेगाने मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप व आयआरबीचं पथकही हजर आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. “आम्ही खाली जाऊन बघितलं तर काहीजण मृत झाले होते. जखमींना आम्ही वर घेतलं. किमान १३ ते १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे”, अशी माहिती बचावकार्य करणाऱ्या सदस्याने पीटीआयशी बोलताना दिली.


 

Leave a Comment

और पढ़ें