भंडारा, दि. २१ : कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. तसेच बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्याची उत्पादनांनाही बाजारपेठ मिळावी. जगाच्या अन्नदात्याला शेतीतील अदयावत ज्ञान कृषी महोत्सवातुन मिळावे अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी आज व्यक्त केली. शेती व्यवस्थापनातील अर्थशास्त्र व पिक बदलाच्या गरजा याबद्दल ही त्यांनी सविस्तर विचार मांडले. जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उदघाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. पाच दिवसीय कृषी महोत्सवाचा शुभारंभ आज १७ मार्च रोजी दसरा मैदानावर करण्यात आला.
उदघाटकीय कार्यक्रमाला खासदार सुनिल मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. तर व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, यांच्यासह महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, पंचायत समिती लाखांदूरचे संजना वरखडे, पंचायत समिती भंडारा सभापती रत्नमाला चेटुले, कृषी समीती सदस्य दिपलता समरीत, जिल्हा परिषद सदस्या पूजा हजारे, जिल्हा परिषद सदस्या सौ. पटले, पंचायत समिती मोहाडी सभापती रितेश वासनिक यासह विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, जिल्हा कृषी अधिक्षक अर्चना कडू, आत्मा संचालक श्री. चव्हाण यासह कृषी, पदुमचे फलोत्पादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कमी उत्पादक खर्चात अधिक उत्पादन मिळावे यासाठी तंत्रज्ञानातील बदल गतीने स्वीकारण्याची गरज असल्याचे मत विभागीय कृषी सहसंचालक साबळे यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे संचालक हिंदुराव चव्हाण, संचालन कृषी अधिकारी योगेश राऊत, तर आभार कृषी अधिकारी वृषाली देशमुख यांनी मानले. कृषी प्रदर्शनात खादयपदार्थाचे स्टॉल, शेती यांत्रिकीकरणाशी संबंधित उपकरणे, शेतीतील विविध प्रयोगासह, यशोगाथा दालन आदींचा समावेश आहे.