सौंदड ग्रा.प. ला स्वच्छ भारत अभियानाचा विसर, उघड्यावर नागरिकांची गैरसोय


सौंदड, सडक अर्जुनी, गोंदिया, ( भामा चुऱ्हे ) दिंनाक: ०९ नोहेंबर २०२२ : तालुक्यातील सौंदड गाव एकमेव मोठे गाव असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ व रेल्वे मार्गाशी जोडले आहे. गावात मोठी बाजारपेठ असून आठवडी बाजार भरते. या आठवडी बाजारात शेकडो दुकाने लावली जातात.पण या बाजारात शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने महिलांची मोठी कुचंबणा होते. मात्र याकडे ग्रा.प. प्रशासनाने दुर्लक्षित केले आहे.

केंद्र व राज्य शासन सन २०१५ पासून स्वच्छ भारत अभियान योजना राबवित आहे. आज सन २०२२ लोटून सुद्धा केंद्र व राज्य शासनाचे धोरण राबविण्याची मानसिकता वरिष्ठ अधिकाऱ्यांची नसून याकडे लक्ष देत नसून अधिकारी फक्त कागदावरच गाव, तालुका व जिल्हा स्वच्छता मुक्त झाल्याचे दाखवून पुरस्कार घेऊन स्वत:ची पाठ थोपाटत आहेत.

आणि दुसरीकडे सौंदड गावात पाच वार्ड असून रेल्वे स्टेशन, कृष्ण वार्ड ते पटेल वार्ड असे दोन किमी. गाव लांब असून मधोमध कोणत्याच ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही. सन २०१३ पासून सौंदड ग्रा.प. मध्ये महिला सरपंच प्रतिनिधित्व करीत असूनसुद्धा त्यांचे या समस्येकडे लक्ष गेले नाही.

तसेच गावात जवळपास २०० कुटुंबाकडे शौचालयाची व्यवस्था नसून ६० कुटुंबाकडे नादुरुस्त पडलेले शौचालय आहेत. त्यामुळे आजही सौंदड-फुटाळा रोड, सुंदरी रोड, राका-सौंदड रोड, गोंडउमरी, रेल्वे लाईन, रेल्वे पोलीस, आंबेडकर वार्डातील रेल्वे फाटक रोड या सिमेंट रोडावर उघड्यावर शौचास बसतात.

गावात असे अनेक घरे आहेत की, त्यांच्याकडे शौचालय तर सोडाच साधे बाथरूम सुद्धा नाही. हे नागरिक गरीब असल्याने मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. म्हणून हे शौचालय बांधू शकत नाही. पडक्या घरात वास्तव्य करून दिवस काढीत आहेत. बाजारातील महिला बाजूला ठेवलेल्या ट्रॅक्टर, मेटॅडोर चा आडोसा घेऊन लघुशंकेसाठी जातात. तरपुरूषांना सुद्धा आडोसा घेऊन लघुशंकेला जावे लागते. असे प्रकरण बसस्थानक, तलाठी कार्यालय, महाराष्ट्र बॅंक,को-ऑफ बॅंक,व राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानकावर हीच परिस्थिती आहे.

वरिष्ठ अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया, पंचायत समिती खंडविकास अधिकारी सडक अर्जुनी आपल्या कार्यालयात स्वच्छता अभियानाची शपथ घेऊन पंधरवडा स्वच्छता अभियान राबवून स्वत:ची पाठ थोपाटत आहेत. स्वच्छ भारत अभियान कागदावरच दाखवून वरिष्ठ अधिकारी स्वत:ची पाठ थोपाटण्यात धन्यता मानत असून “”अंधेरी नगरी में चौपट राजा”” असे म्हणावे लागेल.


 

Leave a Comment