बहुचर्चित पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली


पुणे, वृत्तसेवा, दी. 21 : पिंपरी-चिंचवडचे बहुचर्चित पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली झाली आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत तर कधी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आयुक्त दीड वर्षापूर्वीच शहरात आले होते. आता त्यांची राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. तर, पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.

गृहविभागाने (बुधवार) सायंकाळी या बाबतचे आदेश दिले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी दीड वर्षापूर्वीच कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी पालिकेच्या निवडणुका समोर ठेवून त्यांना शहरात आणले होते.

त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या कलाने कृष्ण प्रकाश यांचा कारभार सुरू होता, अशा तक्रारी समोर येत होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील गन्हेगारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले होते. मात्र नंतर गुन्हेगारीचे प्रमाण हळूहळू वाढू लागल्याने टीका सुरू झाली होती. सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचे धोरण ठेवत कृष्ण प्रकाश यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक देखील सार्वजनिकरित्या जाहीर केला होता.

परिणामी शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती दिसत होती. यातच त्यांचे वाढते सत्कारसमारंभ, त्याद्वारे होणारी प्रसिद्धी हा चर्चेचा विषय बनला होता. जानेवारी महिन्यात एका खून प्रकरणातील आरोपीला पकडताना त्यांनी झाड फेकून मारल्याचा दावा संपूर्ण राज्याच चर्चेचा विषय ठरला होता. काही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या या प्रसिद्धी कार्यक्रमांमुळे नाराज होते, अशी देखील चर्चा होती. त्यामुळे त्यांची लवकरच बदली होणार असं बोललं जात होतं. अखेर यावर आज शिक्कामोर्तब झाला.


 

Leave a Comment