राका/सौंदड कोल्हापुरी बंधाऱ्यावरील पुलावर कठडे लावण्याची मागणी.


  • पुलाच्या बाजूला रिपेरिंग चे काम दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा. 

गोंदिया, सडक अर्जुनी, दींनाक – ०१ फेब्रुवारी २०२२ – तालुक्यातील राका पळसगाव येथील चुलबंद नदीवर कोल्हापूरी बंधारा बांधून आजघडीला अनेक वर्षे पूर्ण होत आहेत, पण या पुलावर कठडे नसल्याने या पुलावर कठडे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, अनेकवेळा काही स्वार्थी लोकांनी नदीपात्रातील रेती उपसा करण्यासाठी पाट्या काढून बंधा-यातील पाणी फोडत असतं.

सन २०२०-२१ मध्ये पळसगाव व सौंदड नंदीपिंडी रेती घाट लिलाव न झाल्याने बंधा-यातील पाणी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत राहत होते. बंधा-यातील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील नदीकाठावरील राका बंधारा ते नदीपात्रात ५ किमी. लांब राष्ट्रीय महामार्गाच्या पुलापर्यंत पाणी राहत असे. या ५ किमी. दरम्यान नदीकाठावरील शेती वाड्यांना पाण्याची मुबलकता होत होती.

त्यामुळे शेतीच्या सिंचनासाठी हा बंधारा वरदान ठरला होता. सन २०१९ मध्ये झालेल्या ढगफुटी मुळे पुलावरून ४-५ फुट पाणी जाऊन पुलावरील दोन्ही बाजूंचे लोखंडी कठडे वाहून गेले तसेच तुटफुट झाले. आणि सौंदडच्या बाजूने नदीच्या दक्षिण दिशेला रोडाच्या काठाला लागून २-३ मी.चा खड्डा पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २०१८-१९ मध्ये या खड्ड्याची दुरुस्ती केली होती. आणि भिंत तयार केली होती. त्यावेळी संबंधित विभागाने रोडाची व खड्ड्याची थातुरमातुर दुरुस्ती केली होती.

वास्तविक चुलबंद नदीच्या पुलावरील कठडे लावणे आवश्यक होते. या पुलावरून साकोली जाण्यासाठी सोयीचा मार्ग असल्याने परिसरातील नागरिक या मार्गाचा अवलंब जास्त प्रमाणात करतात. सदर पुलावरून शाळकरी मुले सायकलने ये-जा करतात. या पुलावर अनेक अपघात झाले असून काहींना अपंगत्व आले आहे, तर काही मृत्यूमुखी पडले आहेत. परंतू सार्व. बांधकाम विभाग सडक अर्जुनी यांनी पुलावर कठडे न बनविता पुलाच्या बाजूला रिपेरिंग चे काम दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोखंडी कठडे लावतांनी संबंधित विभाग व कंत्राटदार यांना भ्रष्टाचार करता आला नसता म्हणून बाजुचे काम दाखवून भ्रष्टाचार करण्यात आला अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. सार्व.बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी या पुलावर एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहेत का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.


 

Leave a Comment