लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपीला फक्त 3 दिवसाची पोलीस कोठडी ?



दिल्ली,वृत्तसेवा, दिनांक – 11 ऑक्टोबर 2021 –  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, आता प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

खरंतर, एसआयटीने आशिष मिश्राच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याचसोबत, यावेळी कोठडी वाढवताना यावेळी न्यायालयाकडून काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत.

लखीमपूर खेरी येथे रविवारी (३ ऑक्टोबर) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या वाहनांच्या ताफ्याखाली चिरडून चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश पोलिसांकडून शनिवारी (९ ऑक्टोबर) रात्री आशिष मिश्राला अटक करण्यात आली होती. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने सुमारे ११ तास केलेल्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली होती.

लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयात एसआयटीने आशिष मिश्राच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केल्यानंतर त्याच्या वकिलांकडून त्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. “एसआयटीनं सांगावं की त्यांना कोठडी का हवी? आशिषला कुठे घेऊन जायचं आहे?”, असं आशिष मिश्राच्या वकिलांनी विचारलं.

सुनावणीदरम्यान न्यायालयात पोलिसांनी अशी माहिती दिली की, “आशिष मिश्राची चौकशी फक्त १२ तासच झाली. त्या चौकशीतही, त्याने समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे, १४ दिवसांची कोठडी आवश्यक आहे.” मात्र, न्यायालयाकडून आशिष मिश्राला फक्त ३ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे, अशी माहिती एका वेबसाईट ने प्रकाशित करीत दिली आहे.


 

Leave a Comment