नाना पटोले रोज बोलतात, त्यावर बोलणं मला शोभत नाही – खा. प्रफुल पटेल


नागपूर, वृत्तसेवा, दिनांक – 17 जुलै 2021 – स्वबळाची घोषणा करणारे काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रडार वर आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक राजकारण्यांनी आपलं मत मांडलं आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनीही भाष्य केलं आहे. ‘आम्ही काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही,’ अशा शब्दांत पटेल यांनी पटोलेंना टोला हाणला आहे.

नाना पटोलेंच्या विधानांमुळे महाविकास आघाडी मधल्या कुरघोड्या लक्षात येतात. पटोले यांनी स्वबळाचा नारा देताना केलेल्या काही विधानांमुळं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली होती. त्यावेळी पवारांनी पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. आता पटेल यांनीही पटोले यांना टोला हाणला आहे. ‘ज्याला जे करायचं आहे ते करू द्या. आमची आघाडी आहे. पण कुठल्याही पक्षाला आम्ही बांधून ठेवलेलं नाही. ते काय करतात, त्यावर आम्ही उत्तरं का द्यायची,’ असा सवाल पटेल यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. सरकारला शरद पवारांचं मार्गदर्शन आहे. पुढंही राहणार आहे. एच. के. पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं. कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात. त्यांच्यासोबत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण पवार साहेबांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले. त्याचा अर्थ काय तो समजून घ्या. नाना पटोले रोज बोलतात, त्यावर बोलणं मला शोभत नाही. त्यांच्याविषयी जे काही बोलायचं होतं, त्यावर पवार साहेब बोलले आहेत. त्यामुळं त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही,’ असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

‘ मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा त्यांच्याकडे कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते’, असा दावाच पटोले यांनी केला आहे. तसंच, ‘राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पक्ष आणखी बळकट करण्याचा आम्हाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. याबद्दल त्यांना माहिती असून ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्त करणार’ असंही पटोले म्हणाले होते ‘


 

Leave a Comment