आमगाव, दिनांक : ०६ मे २०२३ : ५ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती गोरठा ता. आमगांव जि. गोंदिया च्या वतीने भालेकर चौकात असलेल्या बोधिवृक्षा जवळ बुद्ध ( पौर्णिमा ) जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी बौद्ध धम्माच्या तत्वांचे पालन करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला.
यावेळी त्यांनी सांगितलं की तथागतांनी अगदी सोप्या भाषेत सर्वसाधारण जणाला समजेल अशा रीतीने उदाहरणे देऊन जीवन जगण्याचा सार सांगितला. बुद्धांचे तत्त्वज्ञान प्रज्ञा, शील करुणा यावर आधारित आहे. त्यांनी अहिंसेचा पुरस्कार करून जीवितहानी न करण्याची प्रतिज्ञा घेण्यास सांगितले. हिंसा हि तीन प्रकारे घडत असते. मनामध्ये कोणाच्या विरुद्ध आकस, द्वेष, मत्सर, सूडबुद्धी, घृणा इ. ची भावना ठेवणे, शब्दाद्वारे वाईट बोलणे, घृणास्पद बोलणे किंवा शब्दाद्वारे दुसऱ्याला दुखावणे, तसेच दुसऱ्याला इजा पोहोचवणे किंवा शारीरिक दृष्ट्या वार करणे अशा तीनही कृत्यातून हिंसा घडत असते.
करिता कोणाबद्दलही आकासाची भावना, सुडबुद्धीची भावना किंवा द्वेष मनामध्ये बाळगू नये तरच अहिंसेचे पालन आपल्याकडून होईल. तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वानुसार पूजापाठ, अनुष्ठान किंवा यज्ञ करून आपले ध्येय साध्य करता येऊ शकत नाही. त्यासाठी कर्म करणे गरजेचे आहे. जसे कर्म तसे फळ मिळेल. बुद्धांनी आम्हा सर्वांना शांतीचा मार्ग दाखविला. त्यासाठी समाजात समता, बंधुता व सहिष्णुता नांदली पाहिजे. आज समाजात जाती धर्माच्या नावावर ध्रुवीकरण व द्वेष पसरविण्यात येत आहे त्याला बुद्ध धम्मात स्थान नाही. बुद्ध धम्माचे तत्वज्ञान अंगीकारल्यास जगात हिंसा होणार नाही व दुःखापासून मानवाची सुटका होईल.
मंचावर डाॅ, बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति चे अध्यक्ष इसुलाल भालेकर, नंदकिशोर बडगे, ताराचंद साखरे, यशवंत डोंगरे, प्रामुख्यानं बसलेले होते, कार्यक्रमात शशिकलाताई डोंगरे, हर्षल गोविन्द कुंभलवार यांनी आपले मत मांडले, जयंती कार्यक्रमात – सुकदास भालेकर, बारिकराम बडगे, राजकुमार डोंगरे, भुपेश कुंभलवार, विरेंद्र डोंगरे, सि. टी. डोंगरे, विलास शहारे, योगेश्वर डोंगरे, कृणाल भालेकर, प्रेमदास डोंगरे, प्रभात खोब्रागड़े, पवन डोंगरे, महेंद्र शहारे, श्रीमती – कमलाबाई भालेकर आदी उपस्थित होते.