खरीप पिकाला रेंगेपार जलाशयाचे पाणी न मिळाल्याने २५ एकर शेतीचे नुकसान


  • संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी – डॉ. गिरीधर येळे

गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 15 – तालुक्यातील मुंडीपार (ई) येथील डॉ. गिरीधर येळे पोलीस पाटील यांचे १५ एकर व लगतचे १० एकर शेतीला रेंगेपार जलाशयाचे पाणी खरीप हंगामातील धान पिकाला पाणी न मिळाल्याने या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे.डाॅ. गिरीधर येळे यांनी १५ एकर शेतीमधून ८ एकर शेतीला बोडीतून वाटरपंपने पाणी दिले. पण या शेतीला रेंगेपार जलाशयाचे पाणी मुंडीपार(ई) मायनरला आले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे व लगतच्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले. रेंगेपार जलाशय पाणी वाटप समिती यांनी मुंडीपार (ई) मायनरची अनेक वर्षांपासून दुरुस्ती केली नाही. तसेच पाटचारा बरोबर नाही.

त्यामुळे या मायनरला पाणी पोहचत नाही. जुन २०२२ पर्यंत मुंडीपार (ई) मायनर दुरुस्ती, पाटचारा दुरुस्ती करण्यात यावे. जेणेकरून पुढील हंगामात शेतीचे नुकसान होणार नाही व शेतीला पाणी मिळेल. शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे हातचे धान पीक गेले. रेंगेपार जलाशयाचे पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यात दोषी असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी मुंडीपार (ई) चे पोलीस पाटील डॉ.गिरीधर येळे यांनी केली आहे.

परिसरातील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष –


पांढरी जि.प.क्षेत्रात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, काॅग्रेस, भाजपा या पक्षाचे जि.प.सदस्य निवडून आले आहेत. पण या लोक प्रतिनिधींनी रेंगेपार जलाशयाचे व चुलबंद जलाशयाचे दुरुस्ती कडे लक्ष दिले नाही. दोन्ही जलाशयाचे पाणी पांढरी जि. प.क्षेत्रातील गावांतील शेतकऱ्यांचे शेतीला उपलब्ध होते. तलावाचे कॅनलचे (नहर) दुरुस्तीचे काम करायला हवे होते. पण मागिल १०-१५ वर्षांपासून कॅनलचे उपसा न करता गावालगत असलेल्या जंगलातील नाल्या, ढोड्याचे नाला सरळीकरण कामावर कोट्यवधी रुपये खर्च करून शेतकऱ्यांचे शेतात जाणा-या कॅनलचे उपसा केले नाही.

त्यामुळे नहराचे पाणी शेतात पोहचू शकत नाही. दोन्ही जलाशयाचे नहराचे उपसा करण्याचे कामाकडे परिसरातील लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. पांढरी जि.प. क्षेत्रात रेंगेपार जलाशयाचे पाणी लेडेंझरी, मुरपार, धानोरी, कोसमतोंडी, चिचटोला, मुंडीपार (ई) आणि चुलबंद जलाशयाचे पाणी खाडीपार, गोंगले, पांढरी, घटेगाव, सितेपार, म्हसवानी, हेटी, गिरोला, सातलवाडा, मोखो, किन्ही, विर्शी या गावातील शेतकऱ्यांचे ३५०० हेक्टर शेतीला २५ वर्षाआधी मिळत होते. आजघडीला दोन्ही जलाशय मिळून ५०० हेक्टर शेतीला ओलीत सुद्धा होत नाही. याला कारण नहराचा उपसा न होणे आहे, अशी माहिती प्रतिनिधी बरोबर बोलतान्हा डॉ. गिरीधर येळे यांनी दिली. 


 

Leave a Comment