- बकी गेट येथे सायकल वाटप व निसर्ग मार्गदर्शकांना गणवेश वाटप कार्यक्रम, कापडी पिशव्यांचे विमोचन.
सडक अर्जुनी, दि. 09 ऑक्टोंबर : नवेगाव – नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील बकी गेट येथे वन्यजीव सप्ताह निमित्त सायकल वाटप व निसर्ग मार्गदर्शक यांना गणवेश वितरणाचा कार्यक्रम दि. 07 ऑक्टोंबर रोजी ला घेण्यात आला. यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या हस्ते तर गोंदियाचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक प्रमोद पंचभाई यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे कोसबी चे सरपंच नाशिका गहाणे, साकोलीचे उपसंचालक पवन जेफ कोका चे सहाय्यक वनसंरक्षक सुहास कांबळे, हिरवळ संस्थेचे रुपेश निंबार्ते यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाची पूजा करीत दीप प्रज्वलन करण्यात आले, यावेळी व्याघ्र प्रतिष्ठान मार्फत बफर क्षेत्रातील इयत्ता आठवी, नववी व दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने आलेल्या विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले, त्यात प्रिन्सि साखरे, पुनम अंबुले, संध्या पंधरे, काजल भूते, संजया मरसकोल्हे, साक्षी कोसरकर, रितू कुभरे, मनीषा सलामे, स्नेहा ठाकरे यांना सायकल देण्यात आल्या.
गेटवर काम करणाऱ्या निसर्ग मार्गदर्शकाना ड्रेस वाटप करण्यात आले, यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी सांगितले की, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, पर्यावरण पोषक काम केले पाहिजे, ज्या मुलींना आज सायकल वाटप करण्यात आले, त्या सायकलवर स्वार झालेल्या मुलीना जिद्द आणि चिकाटीच्या प्रयत्नाने विमानात उडण्याची क्षमता आली पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
नवेगाव व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या वाढल्यास, येणाऱ्या काळात पर्यटनासाठी मोठी संधी उपलब्ध होऊन परिसरातील नागरिकांचा आर्थिक विकास होईल, असे मार्गदर्शन करताना प्रमोद पंचभाई यांनी सांगितले. महिला बचत खूर्शीपार् यांचेकडून तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे विमोचन करण्यात आले, त्या कापडी पिशव्या पर्यटन गेटमधून आत जाणाऱ्या पर्यटकांना नाममात्र शुल्क घेऊन पिशव्या देण्यात येतील असे सांगण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजक डोंगरगाव वन्यजीव चे वनपरिक्षेत्र अधिकारी छबुकांता भडांगे, नवेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी, बोंडेचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, एसटीपीएफ चे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद पाजारे यांनी केले, प्रास्ताविक पवन जेफ यांनी केले, संचालन करून आभार वनरक्षक अरविंद बडगे यांनी मानले, यावेळी नवेगाव नागझिरा अभयारण्यातील क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक व महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.