- ज्येष्ठांना ‘साईड ब्रँच’मध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
नागपूर, वृत्तसेवा, दि. 20 ऑगस्ट 2024 : नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच ठाणेदारांचे गुन्हेगारांशी आणि अवैध व्यावसायिकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी शहरातील १० ठाणेदारांच्या बदल्या केल्या. तसेच आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या आठ पोलीस निरीक्षकांनाही नियुक्ती देण्यात आली. यामध्ये पुन्हा एकदा नवख्या पोलीस निरीक्षकांना ठाणेदारी देण्यात आली तर ज्येष्ठांना ‘साईड ब्रँच’मध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
डिजिटल लोकसत्ता ने दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणेदारांंना सूचना केल्या होत्या. मात्र, काही ठाणेदारांना लाखोंमध्ये हप्ते येत असल्यामुळे त्यांनी पोलीस आयुक्ताच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. काही ठाणेदारांनी जुगार अड्डे, दारुविक्रेते आणि वरली-मटका चालविणाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध जोपासले होते. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रित न होता वाढत होती. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तब्बल १० ठाणेदारांची बदली केली. हिंगण्याचे ठाणेदार विनोद गोडबोले, कळमन्याचे ठाणेदार गोकुल महाजन आणि मनिष बनसोड यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.
कोतवालीच्या ठाणेदार मनिषा वर्पे यांची सदर (गुन्हे) पोलीस ठाण्यात बदली तर अजनीचे ठाणेदार किरण कबाडी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. यशोधराचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांची पारडी ठाण्यात (गुन्हे) तर अंबाझरी ठाण्यातील निरीक्षक रुपाली बावणकर यांची बेलतरोडी (गुन्हे) येथे बदली करण्यात आली. तर वाहतूक शाखेचे प्रशांत पांडे यांची कळमन्याच्या ठाणेदार पदावर नियुक्ती करण्यात आली.
एमआयडीसीचे निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांची अजनीच्या ठाणेदारपदी तर अतुल मोहनकर यांची कोतवालीच्या ठाणेदार पदावर नियुक्ती करण्यात आली. वाडीचे रमेश खुणे यांची यशोधरानगरचे ठाणेदार पदावर नियुक्ती झाली आहे. चंद्रपुरातून आलेले चंद्रशेखर चकाटे यांची सीताबर्डीचे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्धा येथून पदोन्नतीवर आलेले प्रशांत ठवरे यांची थेट हिंगणा पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. अनुभवी नसलेले ठवरे यांच्या नियुक्तीमुळे पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. चंद्रपूरवरून हजर झालेले नागपूरकर सारंग मिराशी यांना एमआयडीसी वाहतूक विभागाची जबाबदारी देण्यात आली. मनोहर कोरटी यांची विशेष शाखेत तर राहुल वाढवे यांची तहसील (गुन्हे), सुहास राऊत यांची यशोधरानगर (गुन्हे) आणि नागेशकुमार चातरकर यांची हुडकेश्वर (गुन्हे) येथे नियुक्ती करण्यात आली.
आयपीएस अधिकारी निमित गोयल यांनी राजीनामा सादर केला. त्यामुळे रिक्त झालेल्या गुन्हे शाखेच्या प्रमुख पदावर आयुक्तालयात नव्याने रुजू झालेले राहुल माकणीकर यांची नियुक्ती करण्यात आली. माकणीकर हे पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे कार्यरत होते. त्यांनी नागपुरात यापूर्वी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनमध्ये कर्तव्य बजावले आहे. शहराचा अनुभव असल्याने त्यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.