सडक अर्जुनी, दि. 05 ऑगस्ट : गोंदिया जिल्हाच्या विस्तारित कार्यकरिणीची बैठक सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे दि. 04 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांना विविध विषयांवर संबोधित केले. विधानसभा निवडणुकीसाठी थोडाच अवधी आता शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना अधिक ऊर्जेने काम करायचे आहे. असे आव्हान केले.
सदर कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते वेळेवर हजर झाले नाही, परिणामी कंटाळलेले कार्यकर्ते कार्यक्रमातून निघून गेले, यावर उपेंद्र कोठेकर विदर्भ संघटन मंत्री यांनी नाराजी व्यक्त केली, ते म्हणाले ज्यांच्या आधार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला जिंकायचे आहेत ते कार्यकर्ते सभेतून निघून गेले अशा प्रकारचे कार्यकर्ते जर बैठक सोडून निघून जात असतील तर भारतीय जनता पार्टीचा जबाबदार कार्यकर्ता, जबाबदार पदाधिकारी म्हणून मी विचार केला पाहिजे असे बोलत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने जनतेमध्ये खोटे नेरेटिव्ह पसरवून भारतीय जनता पक्षाला विजय पासून वंचित ठेवलं यामध्ये कितपत सत्यता आहे. याची माहिती जनतेमध्ये जाऊन त्यांना समजून सांगा, आणि येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये आपल्या पक्षातील आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान दरम्यान मंचावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत जनहितासाठी राबविण्यात आलेल्या योजना, कल्याणकारी निर्णय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे आहेत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा आहे ‘सबका साथ सबका विकास’ यानुसार आपल्याला आता काम करायचे आहे, असे मत यावेळी व्यक्त केले. तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी, महिला, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी यांसाठी राबविलेल्या आणि राबवित असलेल्या विविध योजनांची यावेळी सर्वांना माहिती दिली, ही माहिती सर्वांनी प्रत्येक जनसामान्य नागरिकापर्यंत कशी पोहचवावी याबाबत मार्गदर्शन देखील केले.
यावेळी सर्वश्री उपेंद्र कोठेकर संघटन मंत्री, माजी खासदार अशोक नेते, माजी मंत्री परिणयजी फुके, माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार संजय पुराम, जिल्हा अध्यक्ष येसूलाल उपराडे, अशोक इंगळे, विजय शिवणकर, खोमेश रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले तसेच दीड हजार च्या जवळपास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे का उपस्थित झाले नाही याची माहिती डॉक्टर परिणय फुके, तसेच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कार्यकर्त्यांना दिली, नागपूर येथे पाऊस आल्या कारणाने गोंदिया येथील कार्यक्रमाला ते उशिरा येणार होते, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक असल्याने ते हजर होऊ शकले नाही, परंतु प्रदेशाध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित न झाल्यामुळे विविध चर्चेला उधाण आले आहे, अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राची जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यात जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात राजकुमार बडोले माजी मंत्री यांच्या अडचणीत वाढ होणार का ? किंवा यात काय बदल होते हे पाहण्यासारखे असेल.