उत्पन्नाचा दाखला नसेल तर केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डच्या आधारे योजनेचा लाभ घेता येणार
मुंबई, वृत्तसेवा : दि. 25 जुलै : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरात महिलांनी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यानंतर आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार, याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी दीड कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांना गिफ्ट देणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचं काम 19 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांना दिले आहेत. ही योजना संपूर्ण तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे, तसंच विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत.
उत्पन्नाचा दाखला नसेल तर केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डच्या आधारे योजनेचा लाभ घेता येणार
लाडकी बहीण योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील घटस्फोटित महिला, विधवा, सेवानिवृत्त महिलांना लाभ मिळू शकेल. मात्र त्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी आता डोमिसाईल सर्टिफिकेटऐवजी जन्मदाखला तसंच मतदार ओळखपत्रही चालणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतून 5 एकर जमिनीची अट हटवली आहे, तसंच अडीच लाखांच्या उत्पन्नाची मर्यादा कायम राहणार आहे. पण जमिनीची अट असणार नाही. तसंच वयोमर्यादाही 65 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे.
अडीच लाख उत्पन्नाचा दाखला नसेल तर केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डच्या आधारे योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसंच मुलगी महाराष्ट्रातली नसेल तर पतीच्या महाराष्ट्रातील पुराव्याच्या आधारेही महिलांना लाभ घेता येणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.