तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागणारा सहाय्यक अभियंता अडकला एसीबी च्या जाळ्यात!


अहमदनगर, वृत्तसेवा, 04 नोव्हेंबर 2023 : लाच मागणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. मात्र तरीही लोकांची काम करून देण्यासाठी अनेक जण लाच मागत असतात. अशाच एका कामासाठी मोठ्या रकमेची लाच मागून स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलाच दणका बसला आहे. अहमदनगर मध्ये शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाल्हवरकर यांच्या पथकाने ही कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. त्याने तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड या इसमाला औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाचे तब्बल 2 कोटी रुपयांचे बिल झाले होते. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउटवर्ड वर घेऊन तत्कालीन अभियंताची सही घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्या अधिकाऱ्याविरोधात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नगरमध्ये दाखल झाले. नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नगर औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ छापा मारला आणि लाचखोर सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली. या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील 50% वाटा होता अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिल्याची माहिती देखील समोर आली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें