३५ लाख ८० हजार ६६६ रुपयांचा घोटाळा प्रकरणी गुन्हा नोंद.
गोंदिया, 06 सप्टेंबर : आदिवासी विकास महामंडळाच्या अधिनस्त आधारभूत किंमतीमध्ये धानखरेदी करणाऱ्या सावली येथील आदिवासी विविध सहकारी संस्थेचा धान घोटाळा उघडकीस आला आहे. लोकसत्ता या वृत्त पत्राने ऑनलाईन बातमी प्रकाशित करीत ०३ सप्टेंबर रोजी दिलेल्या माहिती नुसार : संस्थेने सुमारे ३३ लाख रुपये किंमतीच्या १६५० क्विंटल धानाची अफरातफर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संचालक मंडळासह सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावली येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेतर्फे २०२२-२३ या वर्षात १७३१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आला.
खरेदी केलेला धान भरडाईसाठी देण्याकरिता महामंडळाकडून ‘डीओ’ देण्यात आले. मात्र संस्थेकडून १६५० क्विंटल धान कमी देण्यात आला. चौकशी केली असता असता संस्थेकडे १६५० क्विंटल धान उपलब्ध नसल्याचे समोर आले. ३३ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा धान व २ लाख १४ हजार ६६६ रुपये किंमतीचा बारदाना, असे एकूण ३५ लाख ८० हजार ६६६ रुपयांचा घोटाळा संस्थेकडून करण्यात आला.
आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सदानंद राजुरे यांच्यामार्फत सालेकसा पोलीस ठाण्यात संस्थेचे संचालक मंडळ, सचिवाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. सालेकसा पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे सत्र सुरू केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अध्यक्ष मालचंद सराटे, उपाध्यक्ष देवनाथ बिंझलेकर, सचिव रामसिंग मरसकोल्हे आणि संचालक रतिराम मेलावे यांचा समावेश आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
सावली येथील आदिवासी संस्थेने २०२२ -२३ मध्ये शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेल्या धान्यापैकी १६५०,०० क्विंटल एवढे धान महामंडळाला परत केले नाही. त्याचबरोबर बारदानाचीही अफरातफर करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आल्याने संचालक मंडळाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. : सदानंद राजुरे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी महामंडळ.