- …अशा नागरिकांना ‘निसर्गमित्र भजेपारकर’ हा सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करेल.
प्रतिनिधी, सालेकसा, दिं. 05 ऑगस्ट 2023 : लोकसहभाग आणि नवनवीन उपक्रमांसाठी प्रसिद्ध भजेपार ग्राम वासियांनी सध्या माझी वसुंधरा उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कंबर कसली आहे. लोकसहभागातून येथे रस्त्याच्या दुतर्फा कल्पतरू वृक्ष लागवडीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अभियानाला उभारी देणाऱ्या नागरिकांना ‘निसर्गमित्र भजेपारकर’ हा सन्मान देण्याचा निर्णय देखील ग्राम पंचायतीने घेतला असून या मोहिमेला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून गावात लोकसहभागातून कल्पतरू वृक्षारोपणाची चळवळ सुरू झाली असून शंभरावर झाडांचे नियोजन पूर्ण झाले आहे. वृक्षारोपण झपाट्याने सुरू आहे. रोपटे आणि विटांच्या ट्रीगार्डसाठी येणारा खर्च हा पूर्णतः नागरिकांच्या ऐच्छिक लोकसहभागातून केला जात असून संगोपनाची आणि ट्री गार्डवर पेंटींग करण्याची जबाबदारी ग्राम पंचायत प्रशासनाने घेतली आहे.
पृथ्वीवरील सजीवसृष्टी वाचवायची असेल तर वृक्षारोपण आणि पंचतत्वाचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. ही बाब लक्षात घेत शासनाने देखील माझी वसुंधरा अभियानासह पर्यावरण संवर्धनाचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक संस्था देखील पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीतलावरील सजीव सृष्टीच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत.
दरम्यान माझी वसुंधरा अभियानाला उभारी देण्यासाठी आता भजेपार ग्राम वासियांचा पुढाकर प्रशंसनीय असून वृक्षारोपणाची ही लोकचळवळ इतरांसाठी दिशादर्शक ठरत आहे. ग्राम पंचायतीच्या या अभिनव उपक्रमाला स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ,स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, भजेपार शिक्षण कल्याण संघ, चौरागड आश्रम समिती, सूर्योदय क्रीडा मंडळ, सर्व महिला पुरुष बचत गटासह संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
- वृक्षारोपण मोहिमेच्या बळकटीकरणासाठी पुरस्काराचा प्रयोग!
गावातील नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घरी अंगणात, रस्त्याच्या कडेला किंवा गावातील कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी एका फळझाडाची लागवड करून त्याची ग्राम पंचायत मध्ये रीतसर नोंदणी करून घ्यावी व त्याची निगा राखावी. पुढील 1 वर्षानंतर त्याच झाडाबरोबर स्वतःचा आणि त्या झाडाचा वाढदिवस साजरा करतानाचा आपला फोटो शेअर करावा. ग्रामपंचायत अशा नागरिकांना ‘निसर्गमित्र भजेपारकर’ हा सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करेल. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत अनेकांनी वृक्षारोपण केले आहे.
- वृक्षारोपणाने बाळाच्या जन्माचे स्वागत!
स्थानिक ग्राम पंचायत आणि आरोग्य उपकेंद्राच्या वतीने बाळाच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी बाळाच्या आई वडिलांच्या हस्ते उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्याचा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असून नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.