मुंढरी-रोहा पुलाचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण


• विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुल… 


भंडारा, दि. २८ मे : केंद्रीय रस्ते व इन्फ्रास्ट्रक्चर निधी सीआरआयएफ मधून केंद्राच्या सडक परिवहन मंत्रालयाद्वारे मंजूर झालेल्या मोहाडी तालुक्यातील रोहा मुंढरी येथील वैनगंगा नदीवरील पुलाचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज २६ मे रोजी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. या पुलामुळे रोहा व मुंढरी ही गावे जोडण्यात आली असून हा पुल विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुल असल्याचे यावेळी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

या लोकार्पण सोहळ्याला खासदार सुनिल मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी, लोकप्रतिनीधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहा मुंढरी पुल प्रकल्पाची एकूण किंमत 80 कोटी असून पुलाची लांबी 690 मीटर तर रस्त्याची रुंदी 7.50 मीटर व फुटपाथ 2.25 मीटर आहे. पुलामुळे गावकऱ्यांचे कामाकरीता दळणवळणाचे अंतर कमी झाले आहे. तसेच कृषी विषयक फायदा व मोठ्या बाजारपेठ जोडल्या गेल्या आहे.

या पुलामुळे मुंढरी, करडी, दवडीपार, निलज, मोहगाव, नवेगाव, बोरी, पालोरा, केसलवाडा, खडकी, कन्हाळगाव व इतरही परिसरातील गावकऱ्यांचा 30 किमी अंतराचा फेरा वाचला आहे. पुलामुळे मोहाडी तालुक्यातील चंडेश्वरी माता देवस्थान तसेच तुमसर तालुक्यातील चांदपूर व गायमुख हे तीर्थक्षेत्र, साकोली तालुक्यातील कोका व नागझीरा वन्यजीव अभयारण्य ही पर्यटन स्थळे व औद्योगिक क्षेत्रामध्ये तुमसर तालुक्यातील चिखला, डोंगरी ( बु. ) खाणी व देव्हाडा साखर कारखाना जोडल्या गेला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें