ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है : आ. धर्मराव बाबा आत्राम


आष्टी, दिनांक : २१ मे २०२३ : कोनसरी येथे होऊ घातलेल्या लोह प्रकल्पात स्थानिकांना डावलण्यात येत असल्याने अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी लॉयड मेटल कंपनीला चांगलेच धारेवर धरले असून स्थानिक युवकांवर अन्याय झाल्यास आंदोलन करणार असल्याचे सांगून ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ असा निर्वाणीचा ईशाराच त्यांनी दिला. कोनसरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात 19 मे रोजी आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी, शेतमजूर आणि युवा बेरोजगार मेळावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, उपाध्यक्ष फाईम भाई काजी, योगेश नांदगाये, राकॉचे सचिव कपिल बागडे, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आकेवार, गणपूरचे सरपंच सुधाकर गद्दे, जेष्ठ नागरिक गोमाजी पाटील कुळमेथे, माजी सरपंच आनंद पिदूरकर, माजी उपसरपंच चंद्रकांत बोनगीरवार, मुकुंदा पाटील पावडे, चेतन पेंदाम आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्ह्यात रोजगार निर्मिती व्हावी, स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळावं या उदात्त हेतूने विविध कंपन्यांना लीज देऊन काम सुरू केले. मात्र कोनसरी येथे होऊ घातलेल्या बहुचर्चित लोह प्रकल्पात स्थानिकांना डावलण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या परिसरातील नागरिकांनी अनेकदा भेटी घेऊन विविध समस्या मांडले आहेत. त्यामुळेच याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, सिंचन आणि रोजगार हा आपला अजेंडा आहे. स्थानीकांवर होत असलेला अन्याय कदापिही खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे कंपनीने त्वरित स्थानिकांची यादी तयार करून त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे अन्यथा चावी माझ्याच हातात असल्याचा ईशाराही त्यांनी दिला.

कोनसरी येथे आयोजित मेळाव्यात स्थानिकांनी विविध समस्या मांडले त्यात गावात प्रकल्प होत असल्याने स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र तसे होत नसल्याने स्थानकांमध्ये नाराजी आहे. कंपनीला जमीन हवी आहे मात्र, योग्य मोबदला दिला जात नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव नाही, हाकेच्या अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. मात्र सिंचनाची सोय नाही. पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही. येथील शेतकरी समृद्ध  होण्यासाठी योग्य प्रशिक्षण नाही. एकंदरीत या परिसरात नानाविध समस्या आवासून आहेत. त्यामुळे आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी पुढाकार घेऊन विविध प्रश्न सोडवावे अशी मागणी स्थानिकांनी या मेळाव्यातून केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें