नवी दिल्ली, वृतसेवा, दिनांक : २४ मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुरत सत्र न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने दुसऱ्याच दिवशी लोकसभा अध्यक्षांनी अपात्रतेची केलेल्या कारवाईवर विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जातोय. राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या या कारवाईच्या विरोधात महाराष्ट्राच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरु झाली आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर निषेध व्यक्त करण्यात येतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसच्या गोटात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर काँग्रेसच्या गोटात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्यांची तातडीची ऑनलाईन बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला स्वत: राहुल गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. तर महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी काही दिग्गज नेते उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर त्याचा निषेध कसा करायचा, नेमकी कशाप्रकारे आंदोलनं करायची याबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या बैठकीआधीच राज्यात काँग्रेसकडून आंदोलनं सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन बैठकीनंतर काँग्रेसच्या आंदोलनाची वाटचाल आणखी कोणत्या दिशेची असेल, काँग्रेस नेते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी अवघ्या दोन वाक्यात रोखठोकपणे आपली भूमिका मांडली आहे. “मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. त्यासाठी मी कोणतीही किंमत चुकवायला तयार आहे”, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष आगामी काळात आणखी जास्त तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांमध्ये टीका केली आहे. “चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचं हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.