मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना अंतर्गत आता मागेल त्याला शेततळे मिळणार


ठाणे, दिनांक : २४ मार्च : पर्जन्यधारित शेतीसाठी पाणलोटावर आधारित जलसंधारणाच्या उपाययोजनांव्दारे पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता मागेल त्याला शेततळे देण्यात येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळे घेऊन पाण्याची गरज भागविता येणार आहे. आणि आपल्या जीवनमानात बदल करता येणार आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत शेततळ्यांचा समावेश 2022 मध्ये केला गेला. राज्यातील शेतकऱ्यांना संपन्न आणि लखपती करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यानुसार शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातील एक भाग म्हणून मागेल त्याला शेततळे मिळणार आहे. शेततळ्यांसाठी अनुदान वाटप करण्यात येत असलेल्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे मागील त्याला शेततळे ही संकल्पना वेगाने अंमलात आणली जात आहे.

लाभार्थी पात्रता :-
अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.20 हे. क्षेत्र असणे आवश्यक असून क्षेत्र धारणास कमाल मर्यादा नाही.
अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्टया योग्य असणे आवश्यक राहील.
अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे,सामुहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

अशा आहेत अटी व शर्ती
कृषी विभागाचे कृषी सहाय्यक/कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
लाभार्थ्याने स्वतःच राष्ट्रीयकृत बँक/इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक/कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्स सादर करावा.

कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी.
शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची राहील.
पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वतः करावी.
लाभार्थ्यांना७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे.
मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक राहील.
इनलेट आउटलेट ची सोय असावी शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.
अर्ज कसा करायचा

आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जायचे आणि महाडीबीटी वर लॉगिन केल्यानंतर सिंचन साधने व सुविधा या सदराअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही बाब निवडण्यात यावी. यानंतर इनलेट आणि आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय यापैकी एक उपघटक निवडण्यात यावा. आणि त्यानंतर शेततळ्याचे आकारमान व इतर माहिती निवडून आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याकरीता संकेतस्थळ (महा – डीबीटी पोर्टल) :- https://mahadbtmabit.gov.in अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

– नंदकुमार ब. वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे


 

Leave a Comment

और पढ़ें