न्यू दिल्ली, दिनांक : २३ मार्च २०२३ : देशात कोरोनाची रुग्णसंख्या रोज वाढत असल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर आज २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. चाचण्या वाढवा, मास्क वापरा, रुग्णालयांनी वेळोवेळी मॉकड्रील घ्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना पंतप्रधानांनी आरोग्य यंत्रणेबरोबरच नागरिकांनाही केल्या आहेत़. त्यामुळे कोविड विरुद्ध पुन्हा लढा उभारावा लागेल, सज्ज रहा, असेच स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत.
देशात सध्या एन्फ्ल्यूएंझा, स्वाईन फ्लू आणि कोरोना या तीन विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. चिंताजनक म्हणजे कोरोनाने जानेवारीपासून पुन्हा डोके वर काढले असून, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीत देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय, आरोग्य सचिव राजेश भूषण, ‘आयसीएमआर’ चे व्ही. के. पॉल, गृहसचिव अजय भल्ला आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रुग्णसंख्या 7 हजारांवर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एका दिवसात 1134 नवीन रुग्णांची भर पडली. देशात सध्या कोरोना ऑक्टिव्ह रुग्णसंख्या 7026 गेली आहे. देशात सध्या पॉझिटिव्ह रेट 1.09 टक्के, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.79 टक्के आहे.
मंगळवारी चार राज्यांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड आणि दिल्ली प्रत्येक एका रुग्णाचा मृत्यू झाला.
चाचण्या, लसीकरण वाढवा, मास्क वापरा, मॉकड्रील घ्या
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार पंतप्रधानांनी पाच सूत्रांवर विशेष भर दिला. टेस्ट (चाचण्या), ट्रकर (रुग्णांच्या आरोग्याचा पाठपुरावा), ट्रिट (उपचार), वॅक्सिनेशन (लसीकरण) आणि कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे.
रुग्णालयांनी वेळोवेळी मॉकड्रील घेणे आवश्यक आहे. उपलब्ध बेड, औषधे आणि आरोग्य कर्मचारी यांचा आढावा घेणे. जिनोम सिक्वेंसिंग वाढविणे.
कोरोनाबरोबर एन्फ्ल्यूएंझाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा.
हॉस्पिटल आवारात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांनी मास्क वापरणे.
गर्दीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असणाऱ्यांनी मास्कचा वापर करावा.
मुंबईत दिवसभरात 71 बाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 361 वर
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून गेल्या 24 तासांत केलेल्या 1290 चाचण्यांमध्ये 71 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर फक्त 31 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे मुंबईत आता सक्रिय रुग्णांची संख्या 361 वर पोहोचली आहे.
मुंबईत मार्च 2022 मध्ये शिरकाव केलेला कोरोना पूर्ण आटोक्यात आला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आज आढळलेल्या 71 रुग्णांमधील पाच जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर दर 98.3 टक्के झाला असून कोविड वाढीचा दर 0.0039 टक्के झाला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबईकरांनी कोरोना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.