मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील.


मुंबई, वृत्तसेवा, – मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आले आहे. ओबीसी महासंघाने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा. अनेक ठिकाणी १९ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महांसघाने दिला आहे.

आरक्षणासाठी आता धनगर समाजही आक्रमक

मराठा आरक्षणाचा तिढा कायम असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी येत्या 31 मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असं आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत हे आवाहन केलं आहे. पडळकर यांनी पारंपारिक वेशात आवाहन करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवही केला. 31 मे रोजी धनगर समाजाने आरक्षणाचा जागर करावा. झोपी गेलेल्या सरकारला जागं करावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे


 

Leave a Comment