गोंदिया जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर

गोंदिया, दि. 10 जानेवारी : गोंदिया जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती पदासाठी आज दि. 10 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली असून तीन ठिकाणी सर्वसाधारण, तीन ठिकाणी सर्वसाधारण (महिला), एका ठिकाणी अनुसूचित जाती (महिला) व एका ठिकाणी अनसूचित जमाती सभापती असे आरक्षण जाहीर झाले आहे.

जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण घोषित झालेल्या पंचायत समितीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण, आमगाव सर्वसाधारण (महिला), सालेकसा सर्वसाधारण (महिला), गोरेगाव सर्वसाधारण (महिला), तिरोडा सर्वसाधारण, सडक अर्जुनी अनुसूचित जमाती, देवरी सर्वसाधारण व अर्जुनी मोरगाव अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव असणार आहे.

पंचायत समिती सभापती पदासाठीची ही सोडत कु. स्वरा सोमवंशी (वय 4 वर्ष) नावाच्या बालिकेचे हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांनी आरक्षणाबाबतची संपूर्ण प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली. लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण ठरविण्यात येते असे त्यांनी सांगितले. या बैठकीला उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाचे व शंकेचे समाधान करण्यात आले. दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Comment

और पढ़ें