उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका “भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी आहे”


छ. संभाजीनगर, दिनांक : ०२ एप्रिल : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज संपन्न झाली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. माझे पक्ष चोरले, धनुष्यबाण चोरला, बापही चोरायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, देश हुकूमशाहीकडे जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणतात, आज संभाजीनगरमध्ये समाधानाने, आनंदाने आलोय. हेच ते शहर आणि हेच ते मैदान, 1988 साली महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात दिल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातले होते. तेव्हा त्यांनीच या शहराचे नाव संभाजीनगर केले. त्यानंतर आजपर्यंत काय-काय घडलं, ते तुम्हाला माहितीये. भारतीय जनता पक्षासोबत आपली युती होती. दोनवेळा आपले सरकार आले. पण, औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही तो निर्णय दिला.

मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर तुम्ही मेबुबा मुफ्तींसोबत काय करत होता. आम्ही सत्तेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा शिंदे गटाचं काय चाटतंय? लालू-नितीश यांचं सरकार पाडून तुम्ही नितीश यांचं काय चाटलं? मेघालयातील सरकारवर आरोप केले आणि आता त्यांच्यासोबत सत्तेत बसलेत, अमित शहा तुम्ही आता संगमांचं काय चाटताय? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

शिवरायांचे नाव घेता आणि पाठिमागून वार करता. पदव्या दाखवून तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आणि पीएम मोदींची पदवी मागितली म्हणून 25 हजारांचा दंड होतोय, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

निवडून दिलं म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकत नाही, जनतेला बेफाम सत्तेवर वचक ठेवावाच लागेल. सत्ताधारी सगळं काही त्यांच्या मित्रांसाठी करतायंत, शेतकऱ्यांना मात्र दहा रुपयांचा चेक देऊन चेष्ठा केली जातेय. दडपशाही विरोधात इस्त्रायलमध्ये लोक रस्त्यावर उतरलेत, राष्ट्रपतींनी पंतप्रधांना झापलं, त्यानंतर त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. मला जमीन दाखवायला निघालात, तुम्ही महाराष्ट्राचे नाही आणि आम्हाला शिकवता? भाजपचा सोम्या गोम्या आमच्यावर आरोप करतो आणि आमचं कुणी काही बोललं तर खटले दाखल करता? मविआचं सरकार ज्या पद्धतीनं पाडण्यात आलं, ती पद्धत तुम्हाला मंजूर आहे का? महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेनं होतेय. हा भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.


 

Leave a Comment

और पढ़ें