कार्यकर्त्याच्या बळावरच राजकीय विकास साधला जातो : ना. अनिल पाटील


सडक अर्जुनी, दी. 12 डिसेंबर : विकासाच्या दृष्टिकोनातून अजित दादांनी घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असून आज सत्तेत अनेक विकास कामे करण्यास आम्हाला संधी उपलब्ध झाली आहे. त्यातच कार्यकर्त्यांच्या मागण्या, त्यांच्या अपेक्षा व विकासाच्या गोष्टी कशा पूर्ण करायच्या याचे यथायोग्य नियोजन करून आपल्या मतदारसंघात अधिकाधिक कामे कसे आणता येतील याचा विचार या क्षेत्राचे आमदार यांनी केला असून त्यांच्या प्रयत्नामुळेच या मतदारसंघात विकासाची गंगा बघायला मिळत आहे.

कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असून त्याच्या बळावरच राजकीय विकास अवलंबून असतो असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी केले. अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या एरिया. 51 कोहमारा येथील जनसंपर्क कार्यालय आयोजित स्वागत सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना 11 डिसेंबर रोजी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात शासनामध्ये लवकरच निर्णय घेतला जाणार असून तो निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असेल. याशिवाय येणारे प्रश्न देखील मंत्रिमंडळाच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील. अशी ग्वाही मंत्री महोदयांनी दिली. नामदार अनिल पाटील यांचे सडक अर्जुनी तालुक्यात प्रथमच आगमन झाले असून त्यांच्या आगमना प्रसंगी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ना. अनिल पाटील यांचे स्वागत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच पोलीस पाटील संघटना व इतर संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले. मंचावर प्रामुख्याने आ. मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जि. प. उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर, जी. प. सदस्य सुधाताई रहांगडाले, प. स. सदस्य शिवाजी गहाने, डॉ. रुखी राम वाढई, दानेश साखरे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार यांनी केले तर आभार अर्जुनी मोरगाव येथील तालुकाध्यक्ष लोकपाल गहाने यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें