२० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई
छत्रपती संभाजीनगर, वृत्तसेवा, दि. ०१ जुन : महिन्याला लाखो रुपये पगार घेणाऱ्या लोकसेवकांनी लाचखोरीमुळे राज्यात उच्छांद मांडला असून त्यावर कारवाई करण्याचे काम लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मोठ्या प्रमाणावर करीत आहे. राशन दुकानावर कारवाई व परवानाही रद्द न करण्यासाठी केज तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळयात अडकले आहेत.
नुकतेच अमरावती जिल्हयाच्या चांदूरबाजार तहसील कार्यालयातील महिला तहसीलदार गीतांजली गरड-मुळीक यांना 24 मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली तर त्यांच्यासह एका खाजगी संगणक परिचालकाला देखील ताब्यात घेण्यात आले होते. आठवडा उलटत नाही तर पुन्हा लाचखोर तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
अभिजीत लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारोती माने, अशी लाच मागणाऱ्यांची नावे असून दोघे केज तहसील कार्यालयात अनुक्रमे तहसीलदार व कोतवाल पदी आहेत. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची मागणी करून २० हजार स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांचे रास्तभाव धान्य दुकान असून, त्यांचे रास्त भाव धान्य दुकानामध्ये शासनाकडून मिळालेला धान्यसाठा व तक्रारदार यांनी ग्राहकांना वाटप केलेले धान्य यामध्ये तफावत असल्याचे सांगून तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याकरीता तसेच त्यांचा रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरीता तहसिलदार अभिजीत जगताप याने कोतवाल मच्छिंद्र माने याचे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदार यांच्यासमक्ष ४० हजार रुपये लाच मागणी करुन प्रोत्साहन दिले.
तसेच माने याने तडजोडी अंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचेकडुन लाच रक्कम स्वीकारले. मच्छिंद्र माने यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे व त्यांच्या सापळा पथकातील पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.