मुम्बई वृत्तसेवा, दि. 18 मे 2023 : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
सिद्धरामय्या यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे नावं आघाडीवर होते. पण काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेत सिद्धारामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे.
सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला.
सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजना आहेत.
सिद्धरमय्या यांचा जन्म तीन ऑगस्ट १९४७ रोजी म्हैसूर येथे झाला. तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांचे वडील म्हैसूर जिल्ह्यात के. टी. नरसीपुराजवळ शेती करत होते. आई बोरम्मा गृहिणी होती.
दहा वर्षांपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. बीएसस्सी आणि एलएलबी त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून केली. पाच भाऊ-बहिणींमध्ये सिद्धरमय्या हे दुसऱ्या क्रमांकाचे. ते कुरुबा गौडा समाजाचे आहेत. सिद्धरमय्या म्हैसूरचे वकील चिक्काबोरय्याचे ज्युनिअर होते. काही दिवस त्यांनी कायद्याचे शिक्षण दिले.
सिद्धरामय्या यांच्याकडे एकूण ५१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यापैकी २१ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. तसेच दोघांच्या नावावर ३० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
यापैकी सिद्धरामय्या यांच्याकडे ९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे २० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिद्धरामय्या यांच्या कुटुंबावर २३ कोटी रुपयांचं कर्जदेखील आहे.